इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – नेटवर्क मार्केटिंग कंपनी असलेल्या अॅमवेवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. ईडीने अॅमवेची तब्बल ७५७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. कंपनीने आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप आहे. त्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. याअंतर्गत कंपनीच्या पाच बड्या अधिकाऱ्यांवर ईडीच्या पथकाने छापेमारी केली आहे.
ईडीने दिलेल्या माहितीनुसार, तपासात ईडीला असे लक्षात आले की, अॅमवे कंपनीकडून मल्ीलेव्हल मार्केटिंग करतानाच काही संशयास्पद व्यवहार आढळले. खासकरुन कागदावरच खरेदी-विक्री दाखवून संबंधितांची फसवणूक करणे तसेच सदस्यांना श्रीमंतीचे आमिष दाखवून अधिकाधिक जणांना त्यात सहभागी करुन घेणे याचा समावेश आहे. त्यादृष्टीनेच ईडीने कसोशीने तपास केला आहे. कंपनी आपल्या एजंटच्यावतीने हा सर्व प्रकार करते. अधिकाधिक एजंट बनविणे आणि त्याद्वारे कमिशनचा हा धंदा फसविण्याचा मार्ग असल्याचे ईडीच्या निदर्शनास आले आहे.
https://twitter.com/dir_ed/status/1515994967759802370?s=20&t=PZyI1BhZyuxCvzAXzrlGzw
अॅमवे कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, २०२० ते २०२२ या २ वर्षांच्या कालावधीत कंपनीने तब्बल २७ हजार ५६२ कोटी रुपयांचा व्यवहार केला. यापोटी कंपनीने भारतासह परदेशातील त्यांच्या एजंटला ७ हजार ५८८ कोटी रुपयांचे कमिशन दिले. ईडीच्या कारवाईनंतर अॅमवे कंपनीने म्हटले आहे की, ईडीच्या तपास कार्यात आम्ही सर्वतोपरी सहकार्य करीत आहोत. २०११मधील प्रकरणाचा हा तपास आहे. यापुढेही आमचे सर्व सहकार्य असणार आहे. मात्र, कायदेशीर बाब असल्याने त्यावर अधिक बोलणे किंवा सांगणे संयुक्तिक ठरणार नाही. आम्ही सर्व नियमांचे पालन करुन व्यवसाय करीत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.