पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) धाडसत्र सुरू ठेवले असून यात आणखी एक मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. पुण्यातील एका बँकेत गैरव्यवहार झाला असून या बँकेने तब्बल ४३० कोटींचे अवैध कर्जवाटप केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात बँकेच्या अध्यक्षांसह आणखी काही लोकांवर कारवाईची शक्यता आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने पिंपरी चिंचवड येथील सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्याकडे छापे मारले आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधाराने कर्जवाटप केल्याचं हे प्रकरण आहे. त्यामुळे ईडीने मूलचंदानी यांच्याशी संबंधित इतही ठिकाणी छापे मारले व कागदपत्रे गोळा केली. सेवा विकास सहकारी बँकेच्या संचालकांनी १२४ बनावट प्रस्ताव मंजूर करून कर्जवाटप केले होते. यात अनेक लोकांना व्यक्तिगतरित्या व संस्थेच्या पातळीवर नियमबाह्य पद्धतीने ४३० कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले.
कर्ज प्राप्त करण्याच्या नियमात बसत नसतानाही अनेकांना कर्ज वितरीत करण्यात आले. यात संबंधित व्यक्तिची किंवी संस्थेची कर्ज परत करण्याची पात्रता किंवा क्षमता आहे की नाही, याचीही शहानिशा केलेली नव्हती. यापूर्वी २०२० मध्ये सहकार सहआयुक्त राजेश जाधवर यांनी अॉडिट करून घोटाळा उघडकीस आणला होता. त्यात पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. अमर मूलचंदानी यांच्यासह पाच जणांना अटकही झाली होती.
कोट्यवधींचा पैसा अडकलाय
काही महिन्यांपूर्वीच अमर मूलचंदानी जामिनावर बाहेर आले होते. पण आज ईडीने पुन्हा त्यांच्यावर छापे टाकले. या बँकेमध्ये हजारो लोकांचे कोट्यवधी रुपये ठेवीच्या स्वरुपात अडकलेले आहेत. त्यामुळे बँकेवर आता रिझर्व्ह बँक अॉफ इंडियाने प्रशासक नेमलेला आहे.
तरीही अटक नाही
या प्रकरणात पिंपरी-चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश अडचणीत आले होते. सहायक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांच्या नावाने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीण्यात आले होते. यात संचालकांना अटक करण्यास टाळाटाळ होत असून त्यासाठी साडेतीन कोटी रुपये घेतले आहेत, असे आरोप करण्यात आले होते.
Enforcement Directorate Raid Pimpri Chinchwad In this Case