इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – केंद्रातील मोदी सरकारने सहा वर्षांपूर्वी नोटाबंदी जाहीर केल्याने देशभरात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर अनेक चांगल्या-वाईट घटना घडल्या असून त्याचे पडसाद अद्याप उमटताच आहे, असे म्हटले जाते. कारण नोटाबंदीनंतर आता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कोटींच्या जुन्या नोटांप्रकरणी बिहारमध्ये मोठी कारवाई केली आहे. गया येथील उद्योगपती धीरज जैन, त्यांची पत्नी रिंकी जैन आणि त्यांच्या कंपनीची 8 कोटींहून अधिक मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यापूर्वीही या प्रकरणात अन्य आरोपींची 14.44 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती.
ईडीच्या म्हणण्यानुसार, धीरज जैन, त्यांची पत्नी रिंकी जैन आणि सर्वोदय ट्रेडर्स यांची मालमत्ता मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) जप्त करण्यात आली आहे. यामध्ये धीरज जैन यांच्या नावे 6 भूखंड (किंमत 5.95 कोटी), तर पत्नी रिंकी जैन यांच्या नावे खरेदी केलेले सात भूखंड (किंमत 1.53 कोटी) यांचा समावेश आहे. याशिवाय विविध बँक खात्यांमध्ये जमा केलेले 57.14 लाख रुपयेही जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेली रक्कम या जोडप्याच्या नावावर, त्यांच्या कंपनीशिवाय दिल्लीच्या पत्त्यावर दाखविलेल्या सेलच्या काही कंपन्यांच्या नावावर जमा आहे. सध्या ही जप्ती तात्पुरती करण्यात आली आहे.
नोटाबंदीनंतर लगेचच, सन 2016 मध्ये, गया येथील जीबी रोड येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत कोट्यवधी रुपयांच्या जुन्या नोटा जमा करण्यात आल्या. विविध लोकांच्या नावे उघडलेल्या खात्यांमध्ये पैसे जमा केल्यानंतर ते दिल्ली आणि कोलकाता येथील अनेक कंपन्यांच्या बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात आले. तेथून हे पैसे इतरांच्या खात्यात पाठवून काढले जात होते. याप्रकरणी गया येथील अनेक व्यावसायिकांसह २६ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार सदर मनी लाँड्रिंग प्रकरण 44 कोटी रुपयांचे आहे. आतापर्यंत केलेल्या कारवाईत 22 कोटींहून अधिकची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यापूर्वी, ईडीने इतर अनेक व्यावसायिकांची 14.44 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. या दोन्ही गोष्टींसह ही रक्कम सुमारे 22.5 कोटी रुपये आहे.