मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्य कंपनीला कर्जापोटी मिळालेला पैसा बनावट कंपन्या स्थापन करून त्यांत वळविणे तसेच कर्जाची परतफेड न करता कर्ज थकविणे, या प्रकरणी सुराणा उद्योग समूहाला ईडीने दणका देत कंपनीची ११३ कोटी ३२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये ६७ पवनचक्क्यांचाही समावेश आहे. या प्रकरणी कंपनीच्या संचालकांवर मनी लॉंड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सांगितले की, चेन्नईस्थित सुराणा ग्रुप ऑफ कंपनीजच्या मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीच्या संदर्भात त्यांनी 51 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 67 पवनचक्क्या जप्त केल्या आहेत. या पवनचक्क्यांच्या जप्तीसाठी ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट (पीएमएलए) अंतर्गत प्राथमिक आदेश जारी केला आहे.
या पवनचक्क्या चालवणाऱ्या कंपनीवर ३,९८६ कोटी रुपयांची कथित फसवणूक केल्याचा आरोप आहे. फेडरल एजन्सीने पवनचक्की संलग्न करण्यासाठी प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत तात्पुरता आदेश जारी केला आहे. थकविल्याप्रकरणी सीबीआयने यापूर्वीच तीन एफआयआर दाखल करीत कंपनीच्या संचालकांना अटक केली आहे. या एफआयआरच्या आधारे ईडीने पुढील तपास सुरू केला आहे.
या प्रकरणी उपलब्ध माहितीनुसार, कंपनीला बँकेकडून कर्ज प्राप्त झाल्यानंतर, कंपनीने काही बनावट कंपन्या स्थापन केल्या. यामध्ये आपले कर्मचारी, आपले नातेवाईक यांची संचालकपदी नेमणूक दाखवली. तसेच, या कंपन्यांसोबत केवळ कागदोपत्री खरेदी-विक्रीचा व्यवहार दाखविला. हे सारे करताना बनावट कंपन्यांत वळविलेले पैसे आणि कागदोपत्री व्यवहारातील पैसा, हे सारे पैसे कंपनीने संचालकाच्या वैयक्तिक वापरासाठी खर्च केले.
या कर्जापोटी प्राप्त पैशांतून कंपनीने परदेशांतदेखील दोन ठिकाणी मालमत्तांची खरेदी केली. मात्र बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड केली नाही. परिणामी बँकेचे कर्ज खाते थकीत झाले. या प्रकरणी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश सुराणा, विजय सुराणा आणि अन्य दोन बोगस संचालकांना अटक करण्यात आलेली आहे. तसेच विकत बँकेचे कर्ज थकल्याप्रकरणी यापूर्वी बँकेने जप्ती केली होती. तसेच, कर्जापोटी दिलेल्या रकमेच्या वसुलीसाठी त्यांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली होती.
याच आदेशाचा भाग म्हणून रामलाल जैन यांची ६१.६३ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे. या आदेशानुसार एकूण 113.32 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. बँकांकडून थकबाकी वसूल करण्यासाठी लिलाव करण्यात येत असलेल्या सुराणा समूहाच्या 67 पवनचक्की बेनामी कंपनीच्या नावाने पुन्हा खरेदी केल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या संदर्भात, पवनचक्की आणि त्या ज्या जमिनीवर आहेत त्यांची एकूण किंमत 51.69 कोटी रुपये आहे. मात्र, या पवनचक्क्या कुठे आहेत हे मात्र सांगितले नाही.
गेल्या महिन्यात, तपास एजन्सीने बँक कर्जाच्या फसवणुकीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात सुराणा ग्रुपच्या दोन प्रवर्तकांसह चार जणांना अटक केली. सुराणा इंडस्ट्रीज लि., सुराणा पॉवर लि. आणि सुराणा कॉर्पोरेशन लि.चे व्यवस्थापकीय संचालक आणि प्रवर्तक दिनेश चंद सुराणा आणि विजय राज सुराणा आणि फजीजचे डमी संचालक पी. आनंद आणि आय. प्रभाकरन यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
Enforcement Directorate ED Seized 67 Windmills