नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आता काँग्रेस समर्थित वृत्तपत्र नॅशनल हेराल्डच्या कार्यालयावर छापा टाकला आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या दीर्घ चौकशीनंतर ईडीने ही नवी कारवाई केली आहे. ईडीचे पथक आज नॅशनल हेराल्डच्या कार्यालयासह १२ वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत आहेत. ईडीने 21 आणि 26 जुलै रोजी सोनिया गांधी यांची चौकशी केली होती. त्याआधी नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी यांचीही ईडीने सलग अनेक दिवस चौकशी केली होती. आता एजन्सीने ही नवी कारवाई केली आहे.
दिल्लीतील अनेक ठिकाणी छापे टाकण्याबरोबरच कोलकाता आणि इतर अनेक शहरांमध्येही छापे टाकले जात आहेत. चौकशीनंतर या प्रकरणात छापे टाकण्याची गरज असल्याचे ईडीला वाटले, असे सूत्रांचे म्हणणे आहे. या संपूर्ण प्रकरणात सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी दिवंगत नेते मोतीलाल व्होरा यांचे नाव घेतल्याचे ईडीचे म्हणणे आहे. याशिवाय अनेक व्यवहारांची चर्चा होती, ज्यांची माहिती गोळा करण्यासाठी कागदपत्रांची छाननी करावी लागते. याशिवाय नॅशनल हेराल्डच्या कार्यालयांचा वापर का केला जातो, याचीही चौकशी करण्यात येणार आहे.
दरम्यान, राहुल गांधींनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी फेसबुकवर लिहिले की, ‘स्वतःला एकटे समजू नका, काँग्रेस हा तुमचा आवाज आहे आणि तुम्ही काँग्रेसची शक्ती आहात. हुकूमशहाच्या प्रत्येक हुकुमाशी, जनतेचा आवाज दाबण्याच्या प्रत्येक प्रयत्नाशी आपल्याला लढावे लागेल. तुमच्यासाठी मी आणि काँग्रेस पक्ष लढत आलो आहे आणि लढत राहू. आज देशात कोणत्या मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी हे तुम्हाला चांगलेच माहीत आहे कारण सरकारच्या प्रत्येक चुकीच्या धोरणाचा तुमच्या जीवनावर परिणाम होत आहे.
त्यांनी पुढे लिहिले की, ‘या पावसाळी अधिवेशनात आम्ही सरकारला जनतेच्या प्रश्नांची जाब विचारण्याचा प्रयत्न करत होतो, पण सरकारने विरोधी पक्षातील लोकांना कसे निलंबित केले ते तुम्ही सर्वांनी पाहिले. आमच्या निषेधार्थ आम्हाला अटक झाली, सभागृह तहकूब झाले आणि काल जेव्हा चर्चा झाली तेव्हा सरकारने स्पष्टपणे सांगितले की, ‘महागाईसारखी समस्या नाही’. देश बेरोजगारीच्या महामारीशी झुंजत आहे, करोडो कुटुंबांकडे स्थिर उत्पन्नाचे साधन नाही. पण सरकार कोट्यवधी रुपये केवळ ‘अहंकारी राजाची’ प्रतिमा चमकवण्यासाठी खर्च करत आहे.
Enforcement Directorate ED Raid on National Herald Offices