मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बँकेतील फसवणुकीच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राज्यात मोठी कारवाई केली आहे. यात सहा कोटी ६९ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. मुंबई, पुणे, पनवेल, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील विविध ठिकाणांवर ईडीने छापेमारी केली आहे.
सेवा विकास सहकारी बँकेच्या संचालकांनी कर्जांचे १२४ बनावट प्रस्ताव मंजूर केले होते. या प्रकरणात जवळपास ४३० कोटी रुपये विविध व्यक्ती व संस्थांना नियमबाह्य पद्धतीने वितरित केले. ज्या व्यक्तींची कर्ज मिळण्याची पात्रता नव्हती, त्यांना कर्ज दिले गेले. कर्ज देताना परतफेडीची क्षमता व अन्य निकष तपासले नाही. यामुळे बँकेचे मोठे नुकसान झाले. सहकार सहआयुक्त राजेश जाधवर यांनी २०२० मध्ये या कर्जांविषयीचे ऑडिट केल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला.
बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्याकडे ईडीने काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. त्यानंतर त्यांची संपत्ती ईडीने जप्त केली होती. आता मॅग्नम स्टीलचे कुणाल गांधी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बँक कर्ज फसवणुकीशी संबंधित प्रकरणात ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) 2002 अंतर्गत ही कारवाई केली आहे.
कुणाल गांधी आणि किशोर गांधी हे मॅग्नम स्टीलचे भागिदार आहेत. त्यांनी बँकेच्या कर्जाची रक्कम आपल्या इतर खात्यांमध्ये हस्तांतरित करून त्यातून 3 तात्पुरत्या मालमत्ता खरेदी केल्या. त्यामध्ये अंधेरी, मुंबई येथे असलेले दुकान तसेच कार्यालय, पनवेल येथील एक सदनिका आणि रत्नागिरी येथे असलेल्या शेतजमीनीचा समावेश आहे. पुणे शहरातही 5.24 कोटी रुपयांची प्रापर्टी त्यांनी खरेदी केली होती. या सर्व ठिकाणी कारवाई करताना मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.
साडेसहा कोटींची स्थावर मालमत्ता
मॅग्नम स्टीलचे कुणाल गांधी यांच्यांवर कारवाई करताना त्यांची एकूण ६.६९ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यात आठ मालमत्तांचा समावेश आहे. त्यांत अंधरी येथील फ्लॅट व कार्यालय, पनवेल येथील फ्लॅट, रत्नागिरीत शेत जमीन आदी मालमत्तांचा समावेश आहे.
ED attaches 8 immovable assets situated at Mumbai, Panvel, Pune, Raigad and Ratnagiri in Maharashtra belong to Kunal Gandhi partner of M/s Magnum Steels Mumbai & his family worth Rs. 6.69 Crore under PMLA in bank loan cheating case.
— ED (@dir_ed) March 31, 2023
Enforcement Directorate ED Maharashtra Action 6 Crore Property Seized