नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठा धक्का दिला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणाचा सामना करत असलेल्या जॅकलिनने परदेशात जाण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली होती, परंतु ती खोटे बोलत असल्याचे ईडीने न्यायालयाला सांगितले. अखेर जॅकलिनने कोर्टातील अर्ज मागे घेतला. जॅकलिनने नेपाळमध्ये होणाऱ्या सलमान खानच्या ‘द बँग’ टूरचा एक भाग सांगून परदेशात जाण्याची परवानगी मागितली होती.
200 कोटींच्या फसवणुकीतील ठग सुकेश चंद्रशेखरची ईडी चौकशी करत आहे. या प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसचेही नाव आहे. ती सुकेशची गर्लफ्रेंड आहे. सुकेशने तिला 10 कोटींचे महागडे गिफ्ट दिल्याचा आरोप आहे. जॅकलिनचा पासपोर्ट मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अडकल्यानंतर जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे तिला परदेशात जाण्याची परवानगी नाही. मिळालेल्या माहितीनुसार, जॅकलीनने अलीकडेच दिल्लीच्या कोर्टात परदेशात जाण्याची परवानगी मागितली होती, पण खोटे उघड झाल्यानंतर तिने अर्ज मागे घेतला होता.
जॅकलिनने कोर्टात सादर केलेल्या पत्रात इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी (आयफा) पुरस्कार आणि इतर महत्त्वाच्या कार्यक्रमांच्या नावाखाली परदेशात जाण्याची परवानगी मागितली होती. अबुधाबी, फ्रान्स आणि नेपाळला जाण्याची परवानगी द्यावी, असे तिने म्हटले होते. 17 ते 22 मे दरम्यान तिला आयफासाठी अबू धाबी (यूएई) येथे जावे लागेल, अशी माहिती अभिनेत्रीने न्यायालयाला दिली होती. त्यानंतर कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी फ्रान्सला आणि शेवटी 27 ते 28 मे दरम्यान सलमान खानच्या द-बँग टूर कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नेपाळला तिला जायचे होते. न्यायालयाच्या आदेशानुसार, ईडीने जॅकलिनच्या कारणांची चौकशी केली आणि असे आढळले की आयफा जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे आणि ती नेपाळमधील दा-बँग दौऱ्याचा भाग नाही. ईडीने न्यायालयाला कळवल्यानंतर जॅकलिनच्या वकिलांनी अर्ज मागे घेतला.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, जॅकलिन फर्नांडिसला ईडीने जारी केलेल्या लुक-आउट परिपत्रकाच्या आधारावर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर देश सोडण्यास मनाई करण्यात आली होती. अलीकडेच ईडीने जॅकलिनची ७.२७ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.