मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सक्तवसुली संचालनालयाने आज दोन मोठ्या कारवाया केल्या आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना ईडीने अटक केली आहे. तर, ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांची १० कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.
अनिल परब यांच्यावर मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अनिल परब यांच्या मालकीची बीच रिसॉर्ट आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी येथील जमीन जप्त केली आहे. ईडीने जप्त केलेल्या संपत्तीची किंमत अंदाजे १०.२ कोटी एवढी आहे, अशी माहिती ईडीने दिली. ईडीने या वर्षी जानेवारीमध्ये दापोली, रत्नागिरी येथील गट क्रमांक ४४६ च्या जमिनीवर बांधलेले साई रिसॉर्ट एनएक्स जप्त केले होते. हे रिसॉर्ट पर्यावरण (संरक्षण) कायद्याचे उल्लंघन करत असल्याचा आरोप केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने केला होता. त्यासंबंधी तक्रारही दाखल करण्यात आली होती. सोबतच साई रिसॉर्ट, सी कोंच रिसॉर्ट आणि इतर काही जणांविरुद्ध राज्य पोलिसांनी केलेल्या एफआयआरच्या आधारे मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ईडीने केलेल्या कारवाईची माहिती देतांना म्हटले आहे की, “अनिल परब आणि त्यांचे जवळचे सहकारी सदानंद कदम यांनी महाराष्ट्राच्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ना-विकास क्षेत्रांतर्गत येणाऱ्या शेतजमिनीच्या एका भागावर दुमजली बंगला बांधण्यासाठी बेकायदेशीर परवानगी घेतली. आणि या जमिनीवर कोस्टल रिजन झोन नियमांचे उल्लंघन करून तीन मजली साई रिसॉर्ट बांधले.
किरीट सोमय्यांनी लावले होते आरोप
साई रिसॉर्टचे बांधकाम हे सीआरझेड कायद्याचं उल्लंघन करून करण्यात आले असून यात मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. मागील जवळपास दीड-दोन वर्षांपासून ते या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत. या प्रकरणी सोमय्या यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांच्यावर आरोप केले होते. हे रिसॉर्ट अनिल परब यांच्याशी संबंधित असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. तर, अनिल परब यांनी आरोप फेटाळून लावताना आपला या साई रिसॉर्टशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते.
कोविड घोटाळ्यात सुजित पाटकरला अटक
मुंबई महापालिकेत झालेल्या कोविड घाटोळ्यात सुजित पाटकर यांना ईडीने अटक केली आहे. प्रात्प माहितीनुसार, ते खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय आहेत.
भाजपने महाविकास आघाडीच्या काळात कोविडदरम्यान झालेला घोटाळा उघडकीस आणला आहे. या संपूर्ण घोटाळ्याचा तपास ईडी करत आहे. अशात आता संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेल्या पाटकर यांना अटक झाली आहे. सुजित पाटकर यांच्याबरोबर आणखी दोन जणांना अटक करण्यात आली असून काही जणांवर अटकेची टांगती तलवार आहे. लाईफलाईन हॉस्पिटॅलिटी सर्विसेस कंपनीकडून जंबो कोविड सेंटर उभारण्यात आलं होतं. या कंपनीच्या माध्यमातून अनेक व्यवहार करण्यात आले होते. कोविड काळात जे वैद्यकीय साहित्य खेरदी करण्यात आलं होतं, त्यामध्ये अनेक गैरव्यवहार आढळून आले होते.
ईडीची छापेमारी
दरम्यान काही दिवसांपूर्वीच सुजित पाटकर यांच्याशी संबंधित या प्रकरणात ईडीने राज्यात काही ठिकाणी छापे टाकले होते. मुंबईत पंधराहून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. बीएमसीचे वरिष्ठ अधिकारी, पुरवठादार आणि शहरात कोविड मशिन्स उभारण्यासाठी मदत करणाऱ्या लोकांच्या घरावर हे छापे टाकले गेले होते. अखेर या प्रकरणात आता ईडनं सुजित पाटकर यांना ताब्यात घेतलं आहे. त्यांना मुंबई सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे.