पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रिकाम्या कपाटातून साडेसात लाख रुपये कसे चोरता येतील, असा प्रश्न पडला असेल. पण पुण्यातील एका महिलेच्या निष्काळजीपणाचे वर्णन करण्यासाठी हेच वाक्य परफेक्ट आहे, असे म्हणायची वेळ आली आहे. या महिलेने पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली, तेव्हा त्यांनीही डोक्यावर हात मारून घेतला.
टीव्हीवर, एफएमवर, पेपरमध्ये, मोबाईलवर, मेट्रो स्टेशनवर सगळीकडे सायबर क्राईमपासून सावध राहावे, असा संदेश दिल्यानंतरही एक महिलेला सहजरित्या लाखो रुपयांनी गंडवले गेले. पोलिसांचा तर जनजागृतीवरचा विश्वासच उडावा, अशी ही घटना आहे. हडपसर येथे राहणाऱ्या एका महिलेला आपल्या घरातील एक जुने पण सुस्थितीत असलेले कपाट विकायचे होते. त्यासाठी तिने एका एपची मदत घेतली. असे एप ज्यावर जुन्या वस्तूंची खरेदी-विक्री सातत्याने होत असते. त्या एपवर जाहिरात बघून एक दिवस महिलेला फोन आला आणि त्या फोननंतर जे घडले ते फारच विचित्र आहे. फोनवरील माणसाने महिलेला कपाट घेण्याची इच्छा असल्याचे सांगितले. दोघांमध्येही बोलणे झाले. कपाट रिकामेच होते. पैसे पाठवणे आणि कपाट घेऊन जाणे, एवढाच व्यवहार शिल्लक होता.
बनावट स्क्रीनशॉट
कपाट खरेदी करण्यासंदर्भात डील झाल्यानंतर एक दिवस संबंधित व्यक्तीने महिलेला फोन केला आणि तुम्हाला चुकीने आठ लाख रुपये ट्रान्सफर झाल्याचे सांगितले. आणि महिलेला विश्वास बसावा म्हणून आरोपीने पैसे ट्रान्सफर केल्याचा बनावट स्क्रीनशॉटही पाठवला.
असे उडवले पैसे
आरोपीने पाठविलेल्या स्क्रीनशॉटवर महिलेने विश्वास ठेवला. बँकेत जाऊन तपासले नाही किंवा ऑनलाईनही शहानिशा केली नाही. त्यानंतर आरोपीने कपाटाची रक्कम कापून घेत उर्वरित पैसे परत पाठविण्याची विनंती केली. महिलेने सायबर गुन्हेगाराच्या विनंतीचा मान ठेवत त्याला ७ लाख ६५ हजार रुपये ट्रान्सफरही केले.
उशिरा लागला लाईट
सायबर गुन्हेगाराला ७ लाख ६५ हजार रुपये पाठविल्यानंतरही काही दिवस महिलेला आपण केलेली चूक लक्षात आली नाही. तिला लक्षात आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल करायला गेली. त्यानंतर पोलिसांनी महिलेचे खाते तपासले तर त्यात आठ लाख रुपये क्रेडिट झाल्याचा कुठलाच रेकॉर्ड त्यांना सापडला नाही.
Empty Wardrobe 7 Lakh Fraud Crime How it Happens