नवी दिल्ली – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या खातेधारकांना ई नॉमिनेशन आवश्यक करण्यात आले आहे. ई-नॉमिनेशन केल्याशिवाय खातेधारक पीएफ पासबुक पाहू शकणार नाहीत. आतापर्यंत असे करणे आवश्यक नव्हते. परंतु आता पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम पाहण्यासाठी ई-नॉमिनेशन अनिवार्य करण्यात आले आहे. यापूर्वी खातेधारक ई-नॉमिनेशविना कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या संकेतस्थळावर जाऊन सोप्या पद्धतीने पीएफ शिल्लक आणि पासबुक पाहू शकत होते.
ईपीएफ खात्यात ई-नॉमिनेशनसाठी सर्वात प्रथम नॉमिनीचे नाव द्यावे लागते. त्यांचा पत्ता आणि खातेधारकांशी असलेले नाते सांगावे लागते. नॉमिनीच्या जन्मतारखेसह पीएफ खात्यात जमा अससेल्या पैशांच्या किती टक्के भाग त्यांना द्यायचा आहे हेसुद्धा सांगावे लागते. नॉमिनी अल्पवयीन असेल तर पालकाचे नाव आणि पत्ता द्यावा लागतो. नॉमिनीची सही किंवा त्याच्या अंगठ्याचे ठसे देणे आवश्यक आहे.
यासाठी आवश्यक
कोणत्याही बचत योजनेच्या खात्यासाठी नॉमिनेशन आवश्यक आहे. खातेधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसांना हे पैसे मिळतात. ईपीएफ आणि कर्मचारी निवृत्तीवेतन योजनेच्या प्रकरणातही नॉमिनेशन करणे आवश्यक आहे. जेणेकरून ईपीएफओ सदस्याचा अकाली मृत्यू झाल्यास हे पैसे त्याच्या नॉमिनीला मिळतील.
असे करू शकतात ई-नॉमिनेशन
१) ईपीएफ सदस्यांनी पोर्टलवर यूएएन आणि पासवर्ड टाकून लॉगइन करावे.
२) मॅनेज सेक्शनमध्ये जाऊन ई-नॉमिनेशनच्या पर्यायावर क्लिक करा
३) प्रोफाइलमध्ये रहिवासी पत्ता नमूद करावा. सेव्ह बटनवर क्लिक करून तुम्ही कुटुंबीय आहात की नाही हेसुद्धा निवडावे.
४) कुटुंबीयांच्या सदस्यांचे आधार नंबर, नाव, जन्मदिवस, लिंग, पत्ता, पालक (अल्पवयीन नॉमिनी अअसेल तर) .यांची माहिती भरावी. सेव्ह फॅमिली डिटेल्सवर क्लिक करावे. एकपेक्षा अधिक नॉमिनींची नावेही नोंदवू शकतात.
५) कोणत्या नॉमिनीला किती पैसे मिळतील, याची घोषणाही करू शकता.
६) आधारचा व्हर्च्युअल आआयडी टाकून व्हेरिफाय वर क्लिक करा.
७) ईपीएफओमध्ये नॉमिनेशन पूर्ण करण्यासाठी ओटीपी नोंदवा. त्यानंतर कागदपत्रे देण्याची आवश्यकता भासणार नाही.