मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांना तसेच ठाकरे गटाच्या १४ आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोटीस बजावली आहे. या सर्वांना येत्या ७ दिवसात उत्तर देण्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी सरकार अस्थिर झाले आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
गेल्या वर्षी जून महिन्यात शिवसेनेमध्ये मोठी बंडखोरी झाली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ४० आमदारांनी बंड केले. हे सर्व जण सूरत येथे पळून गेले. त्यानंतर ते तेथून गुवाहाटीला गेले. याच दरम्यान, पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली. मात्र, आम्हाला त्यांचा आदेश लागू नसल्याचे शिंदे गटाने म्हटले. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. काही महिन्यांपूर्वी न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला. त्यात निर्देशित केले की, १६ आमदारांच्या अपात्रतेवरील निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा. या सर्व प्रकरणाचा संपूर्ण अभ्यास केल्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष अॅड राहुल नार्वेकर यांनी शिंदे यांच्यासह ४० आमदारांना तसेच, ठाकरे गटाच्या १४ आमदारांना नोटीस बजावली आहे.
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आता अजित पवार यांच्या नेतृत्वातील गट सहभागी झाला आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच्या चर्चा आहेत. अशातच आता विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री शिंदेंसह ४० आमदारांना नोटीस बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ठाकरे गट आक्रमक झाला. त्यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र देऊन विनंती केली की याप्रकरणी लवकर निर्णय घ्यावा. आता याचाच एक भाग म्हणून ४० आमदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचसोबतच ठाकरे गटाच्या १४ आमदारांनाही नोटीस देण्यात आली आहे. या सर्वांना ७ दिवसात म्हणणे मांडावे लागणार आहे. तसेच, पुरावेही सादर करावे लागणार आहेत.
अपात्र ठरणार
एकनाथ शिंदेंसह १६ आमदार अपात्र ठरणार असून शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागेल. राज्याला नवे मुख्यमंत्री मिळतील असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे शिंदे जाऊन अजित पवार मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा रंगत आहे.