अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
अनेक दिवसांपासून सुरू असलेली ट्विटरची विक्री अखेर संपुष्टात आली आणि हा मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या एलॉन मस्क यांच्याकडे गेला आहे. मस्क यांनी तब्बल ४४ अब्ज डॉलर म्हणजेच ३ लाख ३७ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेत तो विकत घेतला आहे. या खरेदीनंतर ट्विटर मस्क यांच्या ताब्यात येणार आहे. मात्र, ट्विटरची सर्व सूत्रे घेतल्यानंतर जर मस्क यांनी एक मोठा निर्णय घेतला तर त्याची त्यांनी मोठी किंमत मोजावी लागण्याची चिन्हे आहेत. हा निर्णय कोणता ते आपण जाणून घेणार आहोत.
एलॉन मस्क यांनी या कराराची घोषणा करताना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “भाषण स्वातंत्र्य हा कार्यरत लोकशाहीचा आधारस्तंभ आहे आणि ट्विटर हा डिजिटल टाउन स्क्वेअर आहे जिथे मानवतेच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या बाबींवर चर्चा केली जाते. मी यामध्ये नवीन वैशिष्ट्ये जोडणार आहे. मला ट्विटरचा विस्तार करायचा आहे. ट्विटरमध्ये प्रचंड क्षमता असून, मी ट्विटर आणि युझर्ससोबत काम करण्यास प्रचंड उत्सुक आहे,” असं त्यांनी म्हटलं आहे. राजकीय आणि मीडिया अजेंडा तयार करण्यात ट्विटर प्रभावी भूमिका बजावते. मस्कने या कराराची पुष्टी केल्यावर आणि शेअरधारकांनी त्यांचे स्वागत केल्यावर व्यवहार मान्य करण्याची ट्विटरची सुरुवातीची अनिच्छा कमी झाली. त्यानंतरच या करारावर सकारात्मक चर्चा होऊन एलॉनला कंपनी विकण्यात आली.
तर मस्क यांना मोजावे लागतील एवढे अब्ज
ट्विटरच्या बोर्ड मेंबरमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत Twitter Inc चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून पराग अग्रवाल हे काम पाहत आहेत. मस्क यांनी ट्विटरता ताबा घेतल्यानंतर ते अग्रवाल यांना कायम ठेवणार की त्यांना काढून टाकणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. काहींच्या मते ते अग्रवाल यांना कायम ठेवतील तर काहींना वाटते काढून टाकतील. रिसर्च फर्म Equilar च्या मते, अग्रवाल यांना 12 महिन्यांच्या आत काढून टाकल्यास त्यांना तब्बल ३.२ अब्ज रुपये (42 दशलक्ष डॉलर) एवढे द्यावे लागतील. ही बाब मस्क यांना चांगलीच महागात पडू शकते. पराग अग्रवाल हे कंपनीचे पहिले मुख्य तंत्रज्ञान अधिकारी होते, त्यानंतर त्यांना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कंपनीचे सीईओ बनवण्यात आले आहे.
डोर्सी यांना परत आणणार?
इलॉन मस्कने ट्विटर खरेदी केल्यानंतर, ट्विटरचे सह-संस्थापक आणि माजी सीईओ जॅक डोर्सी यांना परत आणण्याची मागणी सोशल मीडियावर होत आहे. दरम्यान, या डीलवर जॅककडूनही प्रतिक्रिया आली आहे. कंपनीचे स्वप्न कोणी साकार करू शकत असेल तर ते इलॉन मस्क असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासोबतच जॅक म्हणाला की, आयडिया आणि सर्व्हिस ही माझ्यासाठी नेहमीच दोन महत्त्वाची क्षेत्रे आहेत आणि मी त्यांच्यासाठी नेहमीच तयार असतो.