इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एलॉन मस्कने ट्विटर विकत घेण्यासाठी एवढी मोठी बोली लावली की कंपनी त्याला नकार देऊ शकली नाही, हे आता सिद्धच झालं आहे. आता कंपनी विकत घेतल्यानंतर मस्क हे ट्विटरवर सातत्याने मुक्त भाषणाचे समर्थन करत आहेत आणि त्याबद्दल ते वारंवार बोलतानाही दिसत आहेत. याबरोबरच आता ट्विटरच्या कर्मचारी विजया गड्डे यांच्यामुळे ट्विटर पुन्हा चर्चेत आलं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्विटरच्या भारतीय वंशाच्या कायदेशीर आणि धोरण टीमच्या प्रमुख विजया गड्डे एका बैठकीत भावूक झाल्या होत्या. मस्क यांनी त्यांच्या एका निर्णयासाठी विजया यांना विनाकारण मध्ये आणल्याचं या रिपोर्टसमध्ये म्हटलं आहे. प्रख्यात पॉडकास्ट होस्ट सागर एजेन्टी यांनी एका ट्विटमधून याविषयी माहिती दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांचा मुलगा हंटर बायडनच्या लॅपटॉप प्रकरणात ट्विटरने केलेल्या कारवाईमुळे समोर आलेल्या वकील विजया गड्डे या मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यामुळे दु:खी झाल्या आहेत. त्या इतक्या भावुक झाल्या की त्यांना रडूही आवरता आलेलं नाही. विजया गड्डेंच्या अशा वागणुकीमुळे त्यांना पद सोडावं लागेल असंही बोललं जात आहे.
कोण आहेत विजया गड्डे?
विजया गड्डेंचा जन्म भारतात झाला आहे. त्यांचे वडील मेक्सिकोतील रिफायनरीत केमिकल इंजिनीअर म्हणून काम करत असल्याने त्या तिथेच वाढल्या. विजयाचे शिक्षण टेक्सासमध्ये झाले. त्यांनी नंतर न्यूयॉर्क लॉ स्कूलमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले. २०११पासून त्या ट्विटर सोशल मीडिया साइटवर काम करत आहे.
हंटर वाद काय होता?
२०१९मध्ये अज्ञात व्यक्तीने दुरूस्तीसाठी दुकानात लॅपटॉप आणला. त्या लॅपटॉपमधून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा मुलगा हंटरची अनेक मोठी गुपिते उघड झाली. या लॅपटॉपवरून ट्रम्प यांच्याशी संबंधित ईमेल, ड्रग्ज घेण्याशी महिलांचे संबंधही समोर आले होते. यानंतर २०२०मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी न्यूयॉर्क पोस्टमध्ये एक बातमी प्रसिद्ध झाली होती. तसेच या कथेशी संबंधित अनेक गोष्टी ट्विटर आणि फेसबुकवर प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. मात्र, ट्विटरने कारवाई करत पोस्ट निलंबित केली. विजया गडदे त्यावेळी कायदेशीर होत्या.