मुंबई – जगातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश एलन मस्क आगामी काळात भारतातील उद्योगपती मुकेश अंबानी आणि सुनील मित्तल यांची चिंता वाढविणार आहे. एलन मस्क यांच्या नेतृत्वाखाली स्पेसएक्सची सॅटेलाइट ब्रॉडबँड सर्व्हिस स्टारलिंक ही कंपनी भारतात एन्ट्री करणार आहे. डिसेंबर २०२२ पासून भारतात ब्रॉडबँड सेवा देण्याची तयारी कंपनीने केली आहे, असे कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले.
कंपनी सध्या टर्मिनल्ससाठी सरकारच्या मंजुरीची वाट पाहात आहे. भारतात कंपनीला यापूर्वीच पाच हजार प्री-ऑर्डर मिळल्या आहेत, अशी माहिती भारतातील स्टारलिंक कंट्रीचे संचालक संजय भार्गव यांनी लिंक्डइन पोस्टमध्ये दिली होती. ब्रॉडबँड सेवा देण्यासाठी ग्रामीण क्षेत्रात काम करण्यास आम्ही इच्छुक आहोत, असेही ते म्हटले होते.
मित्तल-अंबानी यांना टेन्शन का
स्टारलिंकची भारतात एन्ट्री झाल्यामुळे मुकेश अंबानी यांच्या टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आणि सुनील मित्तल यांच्या एअरटेलसमोर आता नवा प्रतिस्पर्धक येणार आहे. सॅटेलाइट ब्रॉडबँड सर्व्हिसच्या माध्यमातून ग्रामीण आणि दुर्गम भागात स्वस्त प्लॅन पुरविण्यात या कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा पाहायला मिळणार आहे. याचा फायदा निश्चितच ग्राहकांना होईल.
संपत्तीत कोण किती पुढे
ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सच्या माहितीनुसार, एलन मस्क जगातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश उद्योगपती आहेत. एलन मस्क यांची २१३ अब्ज डॉलर्स इतकी संपत्ती आहे. तर मुकेश अंबानी यांची ९६.८ अब्ज डॉलर्स असून, अब्जाधीशांच्या यादीत ते अकराव्या स्थानावर आहेत. तर सुनील मित्तल यांची १२.३ अब्ज डॉलर्स संपत्ती असून ते यादीत १७७ व्या स्थानावर आहेत.