इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – इलन मस्क या जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतीने ट्विटरसोबतची डिल अखेर रद्द करत असल्याची घोषणा केली आहे. ट्विटर कंपनी मस्कने विकत घेतल्याची चर्चा गेल्या काही महिन्यात रंगली होती. पण आता स्वतः मस्कनेच ही डिल रद्द करत असल्याचे सांगितल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
इलन मस्कने २५ एप्रिल रोजी ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची ५४.२० बिलियन डॉलर्सला खरेदी करण्याची ऑफर देऊ केली होती. दरम्यान ही डिल काही काळानंतर ४४ बिलियन डॉलरमध्येच निश्चित करण्यात आली होती. हे सगळं सुरु असतानाच आता मस्कनं ट्विटर खरेदी करण्यापासून काढता पाय घेतला आहे.
ट्विटर कंपनी खरेदी मस्कने खरेदी केल्याच्या चर्चा जगभरात गाजल्यानंतर अचानक मस्कने कंपनी खरेदीस नकार देणे अनेकांना पचलेले नाही. त्यामुळे मोठ्या काळापासून सुरु असलेली ही चर्चा आता वेगळ्या वळणावर येऊन ठेपला आहे. ट्विटरनं करारातील अनेक तरतुदींचं उल्लंघन केल्याचा आरोप इलन मस्क यांनी केला आहे. त्यामुळे आपण ट्विटर खरेदी करण्याचा करार रद्द करत असल्याचं मस्कनं जाहीर केलं आहे.
इलन मस्कच्या वकिलांनी याविषयी माहिती दिली आहे. “मस्क यांनी ट्विटरसोबतचा करार आता रद्द केला आहे. ट्विटरनं करारांमधील अनेक तरतुदींचं उल्लंघन केल्यानं मस्क यांनी या निर्णय घेतला आहे. ट्विटरनं मस्क यांच्यासमोर कंपनीचं चुकीचं आणि डोळ्यात धूळफेक करणारं प्रेझंटेशन केलं. त्यावर मस्क यांनी डोळे झाकून विश्वास ठेवला होता”, असं मस्क यांच्या वकिलांनी म्हटलं आहे.
आता कोर्टात जाणार
ट्विटर कंपनी आता इलॉन मस्कला कोर्टात खेचणार आहे. मस्क यांच्याकडून करार रद्द करत असल्याची घोषणा झाल्यानंतर ट्विटरने आता टोकाची भूमिका घेतली आहे. कंपनीला ही डील पूर्ण करण्याची इच्छा आहे. सगळी कार्यवाही सुरळीत सुरु असताना अचानक मस्कने हा निर्णय घेतल्याने ट्विटर कंपनीने नाराजी व्यक्त केली आहे. कायदेशीर गोष्टीचं पालन करुन यासाठी आम्ही कोर्टातही जाण्याची तयारी करत आहोत, असे ट्विटरकडून जाहीर करण्यात आले आहे.
ट्विटरचे चेअरमन ब्रेट टेलर यांनी याविषयी एक ट्विटदेखील केलं आहे. “ट्विटरचे बोर्ड सदस्य इलॉन मस्क यांच्यासोबत करण्यात आलेल्या करारानुसार निमय, अटी आणि ठरलेल्याच किमतीवर डिल पूर्णत्वास नेण्यास कटीबद्ध आहे. ही डिल पूर्ण व्हावी यासाठी आम्ही आता कायदेशीर कारवाईचाही मार्ग अवलंबणार आहोत. आम्हाला विश्वास आहे की यात आम्हाला यश येईल”, असं त्यांनी म्हटलं आहे.
Elon Musk Big Announcement Of Twitter Deal