पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्य मंडळाकडून दहावीचा निकाल जाहीर होऊन बरेच दिवस झाले असले तरी विद्यार्थ्याँना अकरावी प्रवेशाचा भाग दोन भरता येत नव्हता. इतर बोर्डाचे निकाल लागले नसल्याचे कारण त्यामागे होते. आता मात्र हा अर्ज विद्यार्थ्यांना भरता येणार आहे.
विद्यार्थी आणि पालकवर्ग राज्य मंडळाचा दहावीचा निकाल लागल्यापासून अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. या वर्षी मॉक अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे इतर बोर्डाचे निकाल लागेपर्यंत राज्यमंडळाच्या विद्यार्थ्यांना हा अर्ज भरता आला. पण अकरावी प्रवेशासाठी जेव्हा अर्ज जाहीर झाले तेव्हा ते दोन भागात विभागले गेले होते. त्यातला पहिला भाग विद्यार्थ्यांनी भरला मात्र दुसऱ्या भागासाठी सीबीएसई व अन्य बोर्डाच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागणार होती.
आता मात्र अकरावी प्रवेशाचा अर्ज क्रमांक दोन, पसंतीक्रमांक भरता येणार आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशाला गती येऊ शकणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना कोटा प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी अल्पसंख्याक, इनहाऊस, मॅनेजमेंट कोटा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अप्लाय करावा. याद्वारे केवळ कॉलेज पसंती नोंदविण्याची प्रक्रिया सुरू राहील. कॉलेज पसंतीक्रम भरल्यानंतर अर्ज लॉक करणे आवश्यक आहे. या http://11thadmission.org.in वेबसाईटवर सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी अर्जाचा भाग १ व भाग २ भरण्याची प्रक्रिया निकालानंतरच सुरू करता येणार आहे.
२२ जुलैपासून अर्जाचा भाग २ भरता येणार..
एसएससी, आयसीएसई, आयजीसीएसई आणि एनआयओएससह ज्या शिक्षण मंडळांचे दहावीचे निकाल जाहीर झाले आहेत अशा विद्यार्थ्यांना २२ जुलैपासून ऑनलाइन अर्जाचा भाग २ म्हणजेच कॉलेज पसंतीक्रम भरता येणार आहेत. गुणवत्ता यादी जाहीर करण्याची प्रक्रिया मात्र सीबीएसईच्या निकालानंतरच सुरू होणार असल्याची माहिती राज्याचे माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिली आहे.
Eleventh FYJC admission important update Maharashtra Education Department