मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अकरावीची प्रवेशप्रक्रिया अधिक सुटसुटीत आणि सोयीची करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवेशादरम्यान दरवर्षीप्रमाणे होणारा गोंधळ टाळण्यासाठी प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. अकरावीच्या प्रवेशासाठी कोणता बदल करण्यात आला, याची माहिती जाणून घेऊ या.
राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, जर एखाद्या विद्यार्थ्याला पहिल्या पसंतीचे महविद्यालय मिळाले, परंतु त्यात प्रवेश घेतला नाही. तर त्याला पुढच्या फेऱ्यांमधून बाद न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित विद्यार्थ्याला फक्त पुढील फेरीमध्ये प्रवेश मिळणार नाही. त्यानंतरच्या सर्व फेऱ्यांमध्ये संधी मिळणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्याला प्रत्येक वेळी अर्ज भरावा लागणार आहे.
बारावीच्या परीक्षांचा नुकताच निकाल जाहीर झाला आहे. परंतु महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात दहावीचा निकाल जाहीर होणे बाकी आहे. मात्र अकरावीसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीसाठीच्या प्रवेशासाठी अंतिम तारीख जाहीर केली जाणार आहे.
दहावीचा निकाल जाहीर होताच अकरावीच्या प्रवेशाची गडबड सुरू होते. अकरावी प्रवेशादरम्यान अनेकदा गोंधळ पाहायला मिळतो. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी निर्माण होते. ते टाळण्यासाठी सध्याची प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन आणि सुटसुटीत करण्यात आली आहे. राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.