पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दहावीचे निकाल लागल्यानंतर अकरावीच्या प्रवेशासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेशाचे दोन भागांचे मॉक अर्ज उपलब्ध करून दिले होते. यातील एक भाग विद्यार्थी लगेचच भरू शकत होते तर दुसरा भाग इतर बोर्डाचा दहावीचा निकाल लागल्यावरच भरता येणार होता. पण आता दुसऱ्या भागाचा नियम केवळ महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना लागू होत असल्याचे समोर आले आहे. कारण इतर ठिकाणी अकरावीची ऑफलाइन प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. शिक्षण विभागाच्या या दोन परस्परविरोधी भूमिकांमुळे पुण्यात पालकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल लागून आता बरेच दिवस झालेले असले तरी सीबीएसई आणि आयसीएसईचा निकाल अद्याप लागलेला नाही. सर्व विद्यार्थ्यांना सामान न्याय मिळावा म्हणून बाकी बोर्डांचा दहावीचा निकाल लागल्यावरच प्रवेश प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरु करण्यात येईल असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. पण हा निर्णय महापालिका क्षेत्रापुरताच मर्यादित असल्याचे समोर आल्याने विद्यार्थी, पालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या परिस्थितीमुळे राज्यातील शहरी भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेश लांबली आहे.
ऑफलाईन प्रवेशासाठी
अकरावी ऑफलाईन प्रवेशासाठीची अर्ज विक्री १३ जुलैपासून सुरू झाली आहे. २१ जुलैला सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार असून २२ जुलै रोजी पहिली गुणवत्ता यादी, २८ ऑगस्ट रोजी दुसरी तर ३ ऑगस्टला तिसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. या ऑफलाईन प्रवेशप्रक्रियेत सीबीएसई, आयसीएसईसह ज्या केंद्रीय बोर्डांचे दहावीचे निकाल जाहीर झालेले नाही अशा विद्यार्थ्यांसाठी १० टक्के जागा राखीव ठेऊन ही प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यामुळे ऑफलाईन पद्धतीने प्रवेश घेणाऱ्या महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा पुढील शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. पण मुंबई, पुणे, नागपूरसारख्या प्रमुख शहरात राहणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा मात्र अकरावी प्रवेशासाठी विनाकारण वाट बघण्याची वेळ आली आहे.
अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केलेले विद्यार्थी
मुंबई – २ लाख ७७ हजार ८७९
पुणे – ९० हजार ८५२
नागपूर – ३१ हजार ७१४
नाशिक- २५ हजार ०८३
अमरावती – १० हजार ५२१
Eleventh Admission Procedure Delay Students Guardians Education Department