नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील गौळाणे गावाच्या शिवारात प्लास्टिकचे दाणे निर्मिती करणाऱ्या कारखान्याlतून मोठ्या प्रमाणात वीज चोरी होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कंपनीच्या वीज जोडणीची महावितरणच्या भरारी पथकाने तपासणी केली. वीज मीटरच्या मूळ जोडणीमध्ये छेडछाड करून एकूण १ लाख ५९ हजार १५ विद्युत युनिटस म्हणजे एकूण २४ लाख ५३ हजार ५६० रुपयांची वीज चोरी केल्याचे उघड झाले. त्यामुळे महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विद्युतकुमार पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारखाना चालविणारे अरबाज सलीम शेख व दिलीप दातीर यांच्या विरुद्ध नाशिक रोड पोलीस स्टेशनला भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ व १३८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, नाशिक तालुक्यातील गौळाणे गावाच्या शिवारात चुंबळे फार्म जवळ असलेल्या प्लास्टिकचे दाणे निर्मिती करणाऱ्या या कारखान्याच्या ठिकाणी डी. आर. जोशी या नावाने थ्री फेज वीजजोडणी दिलेली असून सदर प्लास्टिकचे दाणे निर्मिती करणाऱ्या कारखाना चालविणारे अरबाज सलीम शेख व दिलीप दातीर हे आहेत. सदर ठिकाणी तपासणीसाठी महावितरणचे भरारी पथक गेले असता वीज मीटरच्या मूळ जोडणीत छेडछाड व फेरबदल करून या प्लास्टिकचे दाणे निर्मिती करणाऱ्या कारखान्याच्या ठिकाणी विजेची चोरी केल्याचे महावितरणच्या भरारी पथकाने केलेल्या तपासणीत उघडकीस आले असून एकूण १ लाख ५९ हजार १५ विद्युत युनिटची म्हणजे एकूण २४ लाख ५३ हजार ५६० रुपयांची वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. महावितरण नाशिकच्या भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विद्युतकुमार विजय पवार यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून सदर कारखाना चालविणारे अरबाज सलीम शेख व दिलीप दातीर यांचे विरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ व १३८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विद्युतकुमार पवार, सहाय्यक अभियंता ए.जी. चव्हाण, वरिष्ठ तंत्रज्ञ एस. एस. जाधव व यु. इ. बागडे यांनी ही कारवाई केली. वीज चोरांविरुद्ध मोहीम तीव्र करण्यात आली असून बेकायदेशीरपणे वीज वापर करणारे महावितरणच्या रडारवर आहेत. भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ व १३८ नुसार वीजचोरी करणाऱ्याला कारावास तसेच दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे ग्राहकांनी कोणतीही क्लृप्ती वापरून वीजचोरीचा प्रयत्न करू नये, तसेच आकडे टाकून वीजचोरी करणे थांबवून अधिकृत वीज जोडणी घेऊनच विजेचा वापर करावा. विजेचा अनधिकृत वापर टाळून संभाव्य कायदेशीर कारवाईपासून दूर राहावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.