मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ठाणे शहरासह मुंबईच्या अनेक भागात आज सकाळी अचानक वीज पुरवठा खंडित झाला आहे. महावितरण कंपनीच्या वीज उपकेंद्रात बिघाड झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगण्याच येत आहे. विशेष म्हणजे, वीजेचा पुरवठा खंडित झाल्याचा थेट फटका राज्यपालांच्या कार्यक्रमालाही बसला आहे. मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडत आहे.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राज्य पुरस्कार स्काऊट गाईड प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली आणि क्रीडा राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा आज सकाळी साडेदहा वाजता राज्य प्रशिक्षण केंद्र स्काऊट गाईड पॅव्हिलियन, शिवाजी पार्क, दादर (प) येथे होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोविडमुळे प्रमाणपत्र वितरण सोहळा होवू शकला नव्हता. त्यामुळे आता दोन वर्षांनंतर हा राज्य पुरस्कार स्काऊट गाईड प्रमाणपत्र प्रदान समारंभ होत आहे. हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच ठाणे, दादर, अंबरनाथ, बदलापूरसह मुंबईच्या अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे.
पडघा येथील उपकेंद्रात बिघाड झाल्याने वीज पुरवठा खंडित झाल्याचे सांगण्यात येत आहे. महावितरणच्यावतीने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, साधारण आणखी तासभर तरी वीज पुरवठा खंडित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यपालांचाच कार्यक्रम अंधारात सापडल्याने वरिष्ठ पातळीवर याची दखल घेण्यात आली आहे. लवकरात लवकर वीज पुरवठा सुरू करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.