मुंबई – देशासह महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार सुरू असताना कडक लॉकडाऊन लागल्याने सर्व उद्योग-व्यवसाय बंद असल्याने अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. तसेच अनेक कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनात देखील कपात झाली आहे. अशातच वीजदरवाढ लागू झाल्याने दुष्काळात तेरावा महिना ठरत आहे.
राज्यात कठोर निर्बंध लागू झाले असून, पुन्हा एकदा अनेक ठिकाणी ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू झाले आहे. संचारबंदीमुळे कुटुंब घरात थांबलेले आहेत. त्यात यंदा कडक उन्हाळा असल्याने तापमानाचा पारा वाढला असून उकाडा असाह्य होत आहे. सहाजिकच विजेच्या उपकरणांचा वापर वाढला असतानाच आता दि. १ एप्रिलपासून निवासी ग्राहकांच्या स्थिर आकारासह स्लॅबनुसार प्रतियुनिट वाढ झाली आहे. त्यामुळे विजेचा वाढलेला वापर आणि वीज दरात झालेली वाढ वीज ग्राहकांना मोठा झटका देणारा आहे.
महावितरणकडून वीज दरवाढीचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. वीज नियामक आयोगाकडे दाखल झालेल्या प्रस्तावास मान्यताही मिळाली आहे. बहुवार्षिक वीज दरवाढीच्या प्रस्तावानुसार दरवर्षी दि. १ एप्रिल रोजी वीज दरवाढ लागू करण्याचे अधिकार महावितरणकडे आहेत, त्यामुळे आता याच कारणामुळे एप्रिलनंतर येणारी वाढीव वीज दराची बिले वीज ग्राहकांना आर्थिक भुर्दंड बसणारी आहेत.
महावितरणने ५०० युनिटच्या पुढे वीज वापर असलेल्या ग्राहकांचा स्थिर आकार दर १०० वरून १०२ रुपये केला आहे. काेराेनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी ‘वर्क फ्राॅम हाेम’ सुरू असून उकाड्यामुळे वीज वापर वाढला आहे. त्यामुळे उन्हासह वाढीव बिल घाम काढणार असल्याची नाराजी ग्राहकांमध्ये आहे.
असा होणार परिणाम
यापुढे ३०१ ते ५०० युनिटमधील ग्राहकांना १० रुपये ३६ पैसे मोजावे लागतील. जुना दर १० रुपये ३२ पैसे आहे. येथे मात्र ग्राहकांना वाढीव बिल भरावे लागेल. तर ५०० आणि त्या पुढील युनिटच्या ग्राहकांना ११ रुपये ८२ पैसे मोजावे लागतील. जुना दर ११ रुपये ७१ पैसे आहे.
महावितरणचा खुलासा
० ते ३०० युनिटमध्ये २ पैसे कमी झाले आहेत. गरीब माणूस किंवा मध्यमवर्गीयांना दिलासा आहे. मात्र ज्यांचा विजेचा वापर जास्त आहे किंवा एसीसारखी मोठी उपकरणे वापरली जातात, ज्यांचा वीज वापर ३०० ते ५०० युनिट आहे, त्यात ४ पैसे वाढ झाली आहे.