इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– आपलं पर्यावरण –
विद्युत प्रकाश प्रदूषण!
हे काय आता नवीन? कालपर्यंत जलप्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनिप्रदूषण हे शब्द कानी पडत होते. त्याचे गांभीर्य लक्षात घेण्याची निकड देखील चर्चिली जाते. या प्रदूषणाचे जमिनीवरील मातीवर होणाऱ्या दुष्परिणामांची चिंताही अलीकडे गांभिर्याने व्यक्त होते आहे. त्यात आता विद्युत प्रकाशामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत, प्रदूषणाबाबत तज्ज्ञ मंडळी बोलू लागली आहे.
विजेचा झगमगाट कोणाला आवडत नाही? घरातल्या कानाकोपऱ्यापासून तर रस्त्याच्या दुतर्फा सर्वदूर दिवे लागलेले हवे असतात लोकांना तर.टेक ऑफ नंतर विमान आकाशात झेपावत असताना किंवा लॅंडिंगसाठी खाली येत असताना खाली दिसणारे लखलखणारे दिवे बघितले, लग्नसमारंभातली रोषणाई बघितली, दिवाळीपासून तर इदेपर्यंतच्या उत्सवात लखलखत्या दिव्यांनी उजळलेला परिसर बघितला की आनंदलहरी मनाच्या कुठल्याशा कोपऱ्यात हिंदोळे घेतात. रेल्वे स्थानकापासून तर विमानतळापर्यंत, गल्ल्यांपासून महामार्गांपर्यंत, पानाच्या टपरीपासून पंचतारांकित हॉटेल्स पर्यंत सर्वदूर दिवे लागलेले असतात. छोट्या मोठ्या घरात, झोपडी-बंगल्यात सगळीकडे विजेचे दिवे ही प्राथमिक गरज होऊन बसली आहे.
खरंतर सूर्य प्रकाश वगळला तर बाकी सारा प्रकाश कॄत्रिम आहे. झिरो व्होल्टच्या बल्बपासून तर चौकातील हायमाॅक्सपर्यंत आणि देव्हाऱ्यातील तेलाच्या दिव्यापासून तर पेटलेल्या मेणबत्ती पर्यंत सर्वप्रकारच्या प्रकाशांचा यात समावेश आहे. रात्री, दिवसा या कॄत्रिम प्रकाशाने परिसर उजळून टाकण्याचा प्रयत्न दिसतो सगळीकडे. हा कॄत्रिम प्रकाश गरजेपुरते किती आणि अनावश्यक किती निर्माण केला जातो, याचा विचार करून बघाच एकदा. बरं, हे दिवे सुरू करण्यासाठी लागणाऱ्या वीजेपलीकडे या प्रकाशामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची चिंता कोण वाहतो इथे? कधी विचार तरी येतो का कुणाच्या मनात की, मी एक बटण दाबून सुरू केलेल्या एका दिव्यामुळे वातावरणावर काय परिणाम होतो?
या कॄत्रिम प्रकाशामुळे जंगली प्राणी, पक्षांचे निसर्गचक्र बिघडते. वातावरणातील कार्बनडाय ऑक्साइडच्या प्रमाणात हा प्रकाश भर घालतो. मानवाच्या झोपेत हा प्रकाश अडथळा निर्माण करतो. या प्रकाशामुळे अवकाशातील तारे स्पष्टपणे दिसत नाहीत. असं म्हणतात की, जगाचा 83 टक्के भाग विद्युत प्रकाशामुळे होणाऱ्या प्रदूषणाने तर 23 टक्के भाग ‘स्काय ग्लो’ ने प्रभावीत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे आणि विद्युत प्रकाशाच्या प्रमाणाबाहेरील वापरामुळे लोक इको सिस्टीम प्रभावीत करताहेत. स्वतःच्या आरोग्याची हेळसांड करीत आहेत. निसर्ग सौंदर्याचा खेळ खंडोबा करीत आहेत. 1992 ते 2017 या काळात हा प्रकार 49 टक्क्यांनी वाढला असल्याचे एक अहवाल सांगतो.
आवश्यक नसेल तेव्हा या प्रकाशाचा वापर टाळणे, अनावश्यक व्होल्टेजचा उपयोग टाळणे असे काही उपाय आहेत खरे, पण लोक त्याबाबत तितकेसे गंभीर नाहीत. परिणामी या मानवनिर्मित प्रक्रियेत मानवापासून तर प्राण्यांपर्यंत, एकूणच ईकोसिस्टीम प्रभावीत होत आहे. त्याचे मनुष्यावर वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक, आरोग्यविषयक परिणामही आहेतच.
सूर्यास्तानंतरच्या काळाचा विचार केला तर अंधारातील ‘ॲन्थ्रोपोजेनिक आर्टिफिशियल लाईट’ चे अस्तित्व या प्रदूषणाला आमंत्रण देणारे असते. अवकाशातील तारे स्पष्टपणे दिसण्यात बाधा आणणाऱ्या घटकांमध्ये वायू प्रदूषणासोबतच या कॄत्रिम प्रकाशामुळे होणाऱ्या प्रदूषणानेही भूमिका बजावली असल्याचे अवकाश अभ्यासकांचे मत आहे. घरं, रस्ते, रस्त्यावर धावणाऱ्या गाड्या, कारखाने, कार्यालये, क्रिकेट – फुटबॉल आदींचे मानवी शौक पूर्ण करण्याच्या हट्टापायी आयोजित होणारे रात्रकालीन सामने, त्यासाठी निर्माण केला जाणारा प्रकाश…किती उदाहरणे द्यायची? मोठमोठे उद्योग असलेला आणि दाट मानवी वस्ती असलेला, अधिक प्रदूषण ग्रस्त असलेला उत्तर अमेरिका, युरोप, आशिया खंडातील भाग, तेहरान, कॅरिओसारख्या शहरात ही समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.
याचा अर्थ जिथे या कॄत्रिम प्रकाशाचे प्रमाण कमी आहे, तिथे त्याचे दुष्परिणाम नाहीत असे अजिबात नाही. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ही समस्या वेगाने विस्तारत गेली असे मानले जाते. सुरुवातीला त्याबाबत कुणी फारसा विचार केल्याचे वा उपाय योजल्याचे चित्र नव्हते. 1980 मध्ये पहिल्यांदा जागतिक पातळीवर डार्क स्काय मुव्हमेंट सुरू झाली. इंटरनॅशनल डार्क स्काय असोसिएशनची स्थापना हे त्या चळवळीचे फलीत. हळूहळू विविध देशांमध्ये या संदर्भात विचार, कार्य, उपाय फारसे नव्हतेच. आता तर परिस्थिती चिंताजनक होऊ लागली आहे. त्यामुळे जगभरात यासंदर्भात कार्य करणाऱ्या संस्था उदयास येत आहेत. युरोप आणि अमेरिकेतील 99 टक्के परिसर विद्युत प्रकाशामुळे होणाऱ्या प्रदूषणाने ग्रस्त आहेत. अकारण वीजेचा किंबहुना विद्युत प्रकाशाचा वापर टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे विजेचा अपव्यय तर होतोच पण प्रदूषणाचा सामनाही करावा लागतोय्. या उजेडावरचे उपाय आताच योजले नाहीत तर भविष्य अंधकारमय होण्याची भीती व्यक्त होते आहे…..
डॉ. प्रवीण महाजन
जल अभ्यासक,
डॉ. शंकररावजी चव्हाण राज्यस्तरीय जलभूषण पुरस्कार्थी (महाराष्ट्र शासन).
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत `चला जाणूया नदीला` राज्यस्तरीय समिती सदस्य, (महाराष्ट्र शासन).
१८१, बाजार रोड, लक्ष्मीभुवन चौक ते रामनगर चौक रोड, धरमपेठ एक्स. नागपूर – ४४००१०
मो.- 9822380111 ईमेल :- pravin5858@gmail.com
Electricity Light Pollution What is It know in Detail by Dr Pravin Mahajan