नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून शिलापूर येथे सीपीआरआय अर्थात नाशिक इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब साकारण्यात आली आहे. या लॅबचे बुधवार १० सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजता केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हस्ते आणि राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या विशेष उपस्थितीत होणार आहे. या प्रकल्पामुळे नाशिकसह महाराष्ट्रातील औद्योगिक व इलेक्ट्रिकल क्षेत्राला कलाटणी मिळणार आहे.
नाशिकच्या औद्योगिक वसाहतीत इलेक्ट्रिकलचे सुमारे साडेचारशेहून अधिक लघु आणि माध्यम उद्योग आहेत. त्यांना इलेक्ट्रिकल पॅनल्स आणि इतर वीज उपकरणांच्या निर्मितीनंतर टेस्टिंग करण्यासाठी सद्या भोपाळ व बँगलोरला जावे लागते. त्यामुळे नाशिकमध्ये इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब स्थापन करण्याची नाशिकच्या उद्योजकांची मागणी होती.याबाबत तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकच्या उद्योजकांना सदर लॅब स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ व नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रयत्नांमुळे नाशिकमध्ये इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब मंजूर करण्यात आली. शिलापूर येथे शंभर एकर जमिनीमध्ये हा प्रकल्प साकारण्यात आलेला आहे.
शिलापूर येथील इलेक्ट्रीक टेस्टिंग लॅब हा प्रकल्प नाशिकमधील विद्युत अभियांत्रिकी क्षेत्राला कलाटणी देणारा असा प्रकल्प आहे. केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थान म्हणजेच सेन्ट्रल पॉवर इंस्टीट्युट या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील खात्याने पश्चिम भारतात हा इलेक्ट्रीक टेस्टिंग प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी तत्कालीन खासदार समीर भुजबळ यांनी हा प्रकल्प पश्चिम भारतामधील महाराष्ट्रात म्हणजेच नाशिकमध्ये सुरु करण्यासाठी नाशिकमध्ये या प्रकल्पाची कशी गरज आहे आणि नाशिकचे वातावरण औद्योगिक दृष्ट्या कसे अनुकूल आहे हे पटवून दिले आणि फेब्रुवारी २०१३ मध्ये नाशिकसाठी हा प्रकल्प मंजुर करून घेतला.
त्यानंतर मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांनी सातत्याने केल्यानंतर जुलै २०१३ मध्ये सी.पी.आर.आय च्या अधिकाऱ्यांनी नाशिक येथे भेट देऊन जागेची पाहणी केली. त्यानंतर २७ जुलै २०१३ रोजी मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात सी.पी.आर.आय चे महानिदेशक आणि इतर वरिष्ट अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शिलापूर येथील १०० एकर जागा नाममात्र दराने देण्याची तयारी दर्शवून जिल्हाधिकारी विलास पाटील आणि सी.पी.आर.आय चे महानिदेशक यांच्यामध्ये सामंजस्य करार घडवून आणला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या मदतीने १५ ऑगस्ट २०१३ रोजी शिलापूर ग्रामपंचायतीकडून ग.नं. २२० ही जागा या प्रकल्पाला देण्यासाठी ठराव करून घेतला. त्यानंतर महिना भरातच जागा हस्तांतरित करण्यात आली. ३१ जानेवारी २०१९ रोजी या प्रकल्पाचे भूमिपूजन करून कामास प्रारंभ करण्यात आला. सुमारे २१६ कोटी रुपये खर्च करून या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तसेच आवश्यकतेनुसार अधिक निधी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सीपीआरआय ही केवळ एक प्रयोगशाळा नाही, तर ती विद्युत सुरक्षेची, संशोधनाची आणि उद्योगविश्वाला दिशा देणारी एक महत्वाची संस्था आहे. जगभरात विद्युत उपकरणांची मागणी प्रचंड वाढत असताना, त्यांच्या गुणवत्तेची खात्री मिळवून देणे ही मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी आता आपल्या नाशिकनेही पेलण्यास सुरुवात केली आहे. नाशिक हे केवळ धार्मिक नगरी नाही तर औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्र म्हणूनही वेगाने विकसित होत आहे. इथे महिंद्रा अँड महिंद्रा, सिमेन्स, किर्लोस्कर, ABB, Crompton, Schneider Electric यांसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी उत्पादन केंद्रे स्थापन केली आहेत. त्यामुळे विद्युत उपकरण निर्मिती आणि त्याच्या गुणवत्तेची तपासणी याची मोठी गरज होती. ही गरज आजच्या या इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबच्या रूपाने पूर्ण होत आहे. शिलापूर येथील इलेक्ट्रीक टेस्टिंग लॅब हा प्रकल्प नाशिकमधील विद्युत अभियांत्रिकी क्षेत्राला कलाटणी देणारा असा प्रकल्प आहे.
या माध्यमातून नाशिक केवळ धार्मिक-पर्यटन नगरी न राहता संशोधन, औद्योगिक आणि रोजगारनिर्मितीचे एक जागतिक केंद्र होईल. या प्रकल्पामुळे नाशिकच्या उद्योजकांना मोठा फायदा मिळणार असून रोजगाराची मोठी संधी देखील मिळणार आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील तसेच देशातील कंपन्यांना जागतिक स्तरावर दर्जेदार चाचण्या मिळतील.निर्यात वाढीस चालना मिळेल.स्थानिक पातळीवर हजारो युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील. नाशिक जिल्ह्यातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना अत्याधुनिक प्रयोगशाळेत प्रशिक्षण घेता येईल. देशविदेशांतर्गत विद्युत उपकरणे वापरासाठी चाचणी परीक्षण आवश्यक असते त्याची सुविधा स्थानिक ठिकाणी होणार असल्याने नाशिकचे नाव आंतरराष्ट्रीय विद्युत बाजारपेठेच्या नकाशावर जाण्यास मदत होणार आहे. नाशिकमधील लहान व मोठ्या विद्युत उपकरणांचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यांचे विस्तारीकरण येथे होण्यास मदत होईल. तसेच इटली, कॅनडा, ब्राझील, इराण, हॉलंड अशा अनेक देशांच्या चाचणी सुविधादेखील सीपीआरआयप्रमाणेच असल्याने स्थानिक उद्योगांना थेट उत्पादनांचा पुरवठा या देशात करणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर रोजगारनिर्मितीसह उद्योजकांच्या वेळेची व वाहतूक खर्चाची बचत होईल.
स्वप्न पूर्ण होत असताना मनस्वी आनंद
नाशिक शहर व जिल्हा औद्योगिक क्षेत्रात अग्रस्थानी येण्याकरता व सामाजिक भान राखून समाजामध्येही नाशिकचे स्थान मोठे व्हावे या दृष्टिकोनातून औद्योगिक संघटनेच्या माध्यमातून केलेल्या कामकाजाचा स्वप्नवत असे असलेले काम आज प्रत्यक्षात उतरताना पाहून एक आगळावेगळा आनंद होत आहे,तत्कालीन पालकमंत्री व तत्कालीन खासदार मा.छगनजी भुजबळ व मा.समीर जी भुजबळ यांनी केलेल्या मदतीशिवाय हे शक्य नव्हते ते आज प्रत्यक्षात येत आहे याचा मनस्वी खूप आनंद होत आहे. औद्योगिक संघटनेमध्ये काम करतांना आपण केलेल्या पाठपुराव्याला आलेले यश प्रत्यक्षात साकार होत आहे हे पाहून मिळत असलेला आनंद अतिशय अद्वितीय असाच आहे. २०१३ ला मी निमाचा अध्यक्ष असताना केलेली सीपीआरआयची टेस्टिंग लॅब च्या मागणीचे स्वप्न आज पूर्ण होत असताना अतिशय मनस्वी आनंद होत आहे.
धनंजय बेळे
माजी अध्यक्ष, निमा.