मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मागील दोन वर्षांमध्ये इलेक्ट्रिक व्हेइकल अर्थात इव्हीची क्रेझ वाढली आहे. चारचाकी, दुचाकी मोठ्या प्रमाणावर दिसू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने इलेक्ट्रिक बाइक व स्कूटरवरील सबसिडी कमी केली असून १ जूनपासून ही वाहने महाग होणार आहेत. याचा थेट फटका ग्राहकांना बसणार आहे.
अवजड उद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, सबसिडीची रक्कम आता १५ हजार रुपये प्रति किलोवॅटऐवजी १० हजार रुपये प्रति किलोवॅट असणार आहे. सरकारने सबसिडीत प्रति किलोवॅट ५ हजार रुपयांची कपात केली आहे. १ जूनपासून याची अंमलबजावणी होणार आहे. मंत्रालयाने अधिसूचनेत म्हटले आहे की, कमी केलेली सबसिडी १ जूननंतर नोंदणी केलेल्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना लागू होईल. म्हणजेच या मे महिन्यात जर कोणी ग्राहक इलेक्ट्रिक बाईक किंवा स्कूटर खरेदी केली तर तो काही पैसे वाचवू शकेल.
सरकारच्या या निर्णयाचा थेट परिणाम अशा लोकांच्या खिशावर होणार आहे, ज्यांना इलेक्ट्रिक टू-व्हीलर खरेदी करायची आहे, कारण आता त्यांना कमी सबसिडी मिळणार आहे. सबसिडी कमी मिळाल्याने त्यांना दुचाकी इलेक्ट्रिक वाहनासाठी जास्त किंमत मोजावी लागणार आहे. यामुळे इलेक्ट्रिक टू-व्हीलरच्या विक्रीवरही परिणाम होऊ शकतो. कारण लोक आधीच इलेक्ट्रिक टू-व्हीलर महाग असल्याच्या तक्रारी करत आहेत.
ग्राहकांना करावा लागणार विचार
सबसिडी कमी केल्यानंतर किमती आणखी वाढतील. ज्यामुळे लोकांना इलेक्ट्रिक टू-व्हीलर खरेदी करताना पुन्हा एकदा विचार करावा लागेल. किंमत कमी ठेवण्यासाठी कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक टू- व्हीलरमध्ये कमी फीचर्स देण्यास सुरुवात करतील अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Electric Vehicle Subsidy Central Government