नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -भारतातील इलेक्ट्रिक वाहन उद्योग हा २०३० पर्यंत सुमारे ४ कोटी रोजगार निर्मिती करणारे क्षेत्र राहणार असून लिथियमचे जगातील सुमारे ६ टक्के साठे हे जम्मू मध्ये सापडल्याने हे लिथियम आयन बॅटरीच्या स्वरूपात ६० कोटी इलेक्ट्रिक वाहनामध्ये वापरण्यात येईल त्याचप्रमाणे लिथियम आयन बॅटरीची किंमत सुद्धा किंमत कमी होईल अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर येथे दिली . ते आज नागपूरच्या राजनगर स्थित केंद्रीय गृह मंत्रालयात अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालय – एनएफएससी येथे ‘इलेक्ट्रिक वाहनातील आगीच्या दुर्घटनेचे व्यवस्थापन’ या विषयावर एका कार्यशाळेला त संबोधित करत होते. याप्रसंगी एनएफएससी नागपूरचे संचालक एन. बी. शिंगणे, उपस्थित होते.
यावेळी त्यांनी माहिती देताना सांगितले की गेल्या ३ वर्षांमध्ये इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांमध्ये 30 आग लागल्याच्या घटना घडल्या असून यामुळे ई व्हेईकलच्या बाजार व्यवस्थेवर परिणाम होत होता. परंतु रक्षा संशोधन विकास संस्था डीआरडीओ तसेच भारतीय तंत्रज्ञान संस्था – आयआयटी यांच्या तज्ञ कमिटीने बॅटरी सुरक्षा यावर संशोधन केले असून ऑटोमेटिव्ह इंडस्ट्रीज स्टॅंडर्ड अर्थात एआयएस या सुरक्षा मानांकनाने बॅटरी सुरक्षा सुनिश्चित केली असून इलेक्ट्रिक बसेस मध्ये फायर डिटेक्शन अलार्म सुद्धा आपण आता अनिवार्य केला असल्याचे त्यांनी सांगितलं.
ईव्ही बॅटरी वेस्ट मॅनेजमेंटच्या संदर्भातील नियम केंद्रीय परिवहन मंत्रालयाने २०२२ लाच आखले असून या संदर्भात बॅटरी रिकव्हरी आणि रिसायकलिंग व्यवस्थापनाकरिता बॅटरी उत्पादकांवर हे नियम बंधनकारक केले असल्याचं गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केलं .हायड्रोजन, इथेनॉल, सीएनजी, इलेक्ट्रिक हे भविष्यातील इंधन असून यां इंधनाच्या वापराने किफायतशीर प्रदूषण मुक्त असे इंधन उपलब्ध होऊन यामुळे सुरक्षित परिवहन सुनिश्चित होणार आहे. शेतातील तणस, परळी ऊसाची मळी यापासून बायो सीएनजीच्या निर्मितीचे ४०० प्रकल्प मंजूर झाले असून त्यापैकी ६० प्रकल्प सध्या सुरू झाली असून भंडारा जिल्ह्यात सुद्धा राईस हस्क पासून बायो सीएनजीचा प्रकल्प चालू झाला असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.
सुमारे ३० लाख इलेक्ट्रिक वाहने नोंदणीकृत असून २०२३-२४ मध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीमध्ये ४५ टक्के वाढ झाली असून २०२४ मध्ये एकूण बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांचे प्रमाण हे ६.४ टक्के आहे .इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीमध्ये ५६ टक्के विक्रीचे प्रमाण हे इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांच असल्याचे देखील त्यांनी सांगितलं. इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रामध्ये ४०० हून अधिक जास्त स्टार्टअप निर्माण झाले असून २०२५ पर्यंत हायब्रीड आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेतील प्रमाण हे ८ टक्के पेक्षा जास्त होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.