ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पेट्रोलला पर्याय व पर्यावरणपूरक म्हणून भारताने इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणल्या खऱ्या, परंतु या स्कूटरच आता जिवघेण्या ठरू लागल्या आहेत. वसईमध्येदेखील काल एका चिमुरड्याचा इलेक्ट्रिक स्कुटरच्या बॅटरीने बळी घेतला आहे.
भारतात आत्तापर्यंत इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे उन्हाळ्यात चालत्या गाड्यांनी पेट घेतला आहे. वसईमध्ये घडलेल्या घटनेतही इलेक्ट्रिक स्कूटर चार्जिंग लावलेली असताना अचानक बॅटरीचा स्फोट झाला. यामध्ये सात वर्षाचा चिमुकला ७० ते ८० टक्के भाजला. तिथे जमलेल्या लोकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मृत झालेल्या चिमुकल्याचे नाव शब्बीर शाहनवाज अन्सारी असे आहे. वसई पुर्व येथील रामदास नगर मध्ये ही घटना घडली आहे.
२३ सप्टेंबरच्या रात्री चिमुकल्याच्या वडिलांनी शाहनवाज अन्सारी यांनी घराच्या हॉलमध्ये गाडीची बॅटरी चार्जिंगला लावली होती. सकाळी पाच वाजण्याच्या सुमारात त्या बॅटरीचा अचानक स्फोट झाला. त्यावेळी हॉलमध्ये झोपलेला शब्बीर आणि त्याची आई त्या दुर्घनेमध्ये भाजली. शब्बीर अधिक अधिक भाजला असल्यामुळे त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. गेल्या काही काळात इलेक्ट्रीक वाहनांच्या दुर्घटनांमध्ये वाढ होत आहे. अशा वाढत्या घटनांमुळे चालकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Electric Scooter Blast child Death
Vasai Automobile