मुंबई – पेट्रोल डिझेलचे वाढते दर लक्षात घेता इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढणे अत्यंत स्वाभाविक आहे. मात्र यामध्ये केवळ चारचाकींची विक्री वाढली आहे असे नाही तर बाईक्सही मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरल्या आहेत. भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक बाईक्सची मागणी वाढल्याचे आढळून आले आहे.
इलेक्ट्रिक दुचाकी निर्मितीमध्ये आघाडीवर असलेल्या Joy e-bike या कंपनीच्या दुचाकींची विक्री मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. आगस्टमध्ये बाईकच्या विक्रीत तब्बल 435 टक्के नफा झाल्याचे कंपनीने सांगितले आहे. आगस्टमध्ये 2001 इलेक्ट्रिक बाईक्सची विक्री झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत 374 गाड्या जास्त विकल्या गेल्या आहेत. जुलैमध्ये 945 गाड्यांची विक्री झाली होती.
कंपनीने आतापर्यंत सर्वाधिक 4 हजार 500 गाड्यांचे बुकिंगही नोंदविले आहे. यावर्षी मार्केटमध्ये आपली उपस्थिती बळकट करण्यावर आमचा जोर आहे, असे कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी म्हटले आहे. आमच्या गाड्यांना मागणी वाढत आहे. याशिवाय बुकिंग आणि चौकशी करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. आम्हाला सर्वात जास्त महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या चार राज्यांमधून सर्वाधिक बुकिंग मिळत आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.
90 किलोमीटर प्रति तास
सद्यस्थितीत या वाहन निर्माता कंपनीची उपस्थिती देशातील 25हून अधिक शहरांमध्ये आहे. त्यांचे लक्ष्य ही संख्या वाढविण्यावर आहे. 90 किलोमीटर प्रती तास असा अॅव्हरेज देणाऱ्या थंडरबोल्ट आणि स्कायलाईन या गाड्या जॉय ई-बाईकच्या पोर्टफोलियोमध्ये आहेत. या बाईक्स सिंगल चार्जिंगमध्ये 100 किलोमीटरपर्यंत धावू शकतात, असा दावा कंपनीने केला आहे. गाडी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 5 ते 5.30 मिनीटांचा वेळ लागतो असे सांगण्यात आले आहे. या बाईक्सची किंमत 1 लाख 56 हजार रुपये आहे. याशिवाय कंपनीच्या स्कुटर्सचीही विक्री दणक्यात होत आहे.