मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक असतांना महाविकास आघाडीने २९ जागांवर तर महायुतीने २८ जागांवर अद्याप उमेदवार जाहीर केले नाही. आज रात्रीपर्यंत हे उमेदवार जाहीर होतील असे बोलले जात आहे.
महाविकास आघाडीने २८८ पैकी २५९ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. यात काँग्रेस ९९, शिवसेना ठाकरे गट ८४, राष्ट्रवादी शरद पवार गट ७६ जागा जाहीर झाल्या आहे. महाविकास आघाडीत १८ जागां या मित्रपक्षासाठी सोडल्या होत्या. त्याबाबत अद्याप निर्णय समोर आलेला नाही. या आघाडीत शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट व काँग्रेस या तीन पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांत काही जागांव मतभेद अजूनही कायम आहे. या आघाडीचा ९०-९०-९० असा फॅार्म्युला ठरला असल्याचे बोलले जात होते. पण, काँग्रेसने ९९ जागा जाहीर केल्या. त्यामुळे जागांवाटपाचे सूत्रही अद्याप पर्यंत समोर आलेले नाही.
तर दुसरीकडे महायुतीने २६० जागांवर उमेदवार जाहीर केले आहे. यात भाजपने १४६, शिवसेना शिंदे गट ६५, राष्ट्रवादी अजित पवार गट ४९ जागांवर उमेदवार जाहीर केले आहे. महायुतीत भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट हे तीन पक्ष आहे. या तिन्ही पक्षात काही जागांवर मतभेद आहे. महायुतीत जागांवाटपाचे सूत्रही अद्याप समोर आलेले नाही.