नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय निवडणूक आयोग नववर्षात देशवासियांना मोठे गिफ्ट देणार आहे. ते म्हणजे मतदारांना आता मतदानासाठी आपल्या राज्यात जाण्याची गरज राहणार नाही. परराज्यात राहूनही आपल्या राज्यातील निवडणुकीचे मतदान मतदारांना करता येणार आहे. यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत होणार आहे. शिवाय लोकशाही बळकट होण्यास मोठी मदत होईल, अशी अपेक्षा आयोगाला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज सांगितले की, त्यांनी स्थानिक स्थलांतरित मतदारांसाठी रिमोट इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा नमुना विकसित केला आहे. हे नवे तंत्र राजकीय पक्षांना दाखविले जाणार असून त्यासाठी येत्या १६ जानेवारीला राजकीय पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. रिमोट मतदान यंत्रांबाबतही एक चिठ्ठी जारी करण्यात आली आहे. कायदेशीर, प्रशासकीय आणि तांत्रिकदृष्ट्या त्याची अंमलबजावणी करण्याबाबत राजकीय पक्षांनाही त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीद्वारे निर्मित मल्टी कॉन्स्टिट्यून्सी रिमोट ईव्हीएम एकाच ठिकाणाहून ७२ मतदारसंघ चालवू शकते. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, युवकांमध्ये आणि शहरी भागात राहणार्या लोकांमध्ये निवडणुकांबाबत दिसून येत असलेली उदासीनता पाहता, लोकशाही प्रक्रियेत सहभाग वाढवण्यासाठी रिमोट मतदान यंत्रे एक प्रभावी उपक्रम ठरतील.
निवडणूक आयोगाने शोधलेल्या या यंत्रामुळे मतदारांना त्यांच्या राज्यातच मतदान करता येईल. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होत असेल आणि मतदार जर परराज्यात असेल तर त्या मतदाराला महाराष्ट्रात येऊन मतदान करण्याची गरज राहणार नाही. तो मतदार त्या राज्यातच मतदान केंद्रात जाऊन मतदान देऊ शकेल.
१९७७ मध्ये, निवडणूक आयोगाने हैदराबाद-आधारित इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) वर मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे बनविण्याची जबाबदारी सोपवली होती. जेणेकरून बॅलेट पेपरद्वारे मतदान करण्याच्या किचकट आणि कंटाळवाण्या प्रक्रियेतून सुटका व्हावी. संस्थेने ९७९ मध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, बेंगळुरूच्या मदतीने त्याचा नमुना विकसित केला आणि निवडणूक आयोगाने १९८० मध्ये राजकीय पक्षांना सादर केला.
ईव्हीएमचा पहिला वापर १९८२ मध्ये केरळच्या सार्वत्रिक निवडणुकीत झाला होता. मध्य प्रदेश, दिल्ली आणि राजस्थानच्या विधानसभा निवडणुकांमध्ये १९९८ मध्ये प्रथमच मर्यादित संख्येत याचा वापर करण्यात आला. २००१ नंतरच्या सर्व विधानसभा निवडणुकांमध्ये त्याचा वापर होत आहे. यासोबतच २००४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ५४३ लोकसभा मतदारसंघात मतदानासाठी याचा वापर करण्यात आला होता. ईव्हीएम सुरू झाल्यापासून मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया सुलभ झाली आहे. अलीकडच्या काळात तरुणांचा आणि शहरी लोकांचा निवडणुकांकडे कमी होत चाललेला कल पाहता रिमोट इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनची गरज बऱ्याच दिवसांपासून जाणवत होती.
ECI invited all political parties on 16.01.2023 to demonstrate functioning of the Multi-Constituency RVM. Based on feedback from various stakeholders & demonstration of the prototype, Commission will appropriately carry forward process of implementing the remote voting method:ECI pic.twitter.com/MJQZ9uRmiJ
— ANI (@ANI) December 29, 2022
Election Commission Good News Prototype Cast Vote
Voting EVM