विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
देशात पसरलेल्या दुसर्या कोरोनाच्या लाटेला निवडणूक आयोगच जबाबदार आहे, अशा शब्दात मद्रास उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर निवडणूक आयोगाला जाग आली आहे. निवडणूक आयोगाने आता महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात २ मे रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी मिरवणुका काढण्यावर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे, यासंदर्भातील आदेश लवकरच जारी केला जाईल.
राजकीय पक्षांना प्रचारसभा घेण्यासाठी तुम्ही परवानगी कशी दिली, असा सवाल मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव बॅनर्जी यांनी सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान उपस्थित केला. देशातील दुसर्या लाटेला तुम्हीच जबाबदार आहात. तुमच्या अधिकार्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल व्हायला हवा, असा संताप न्यायालयाने व्यक्त केला. न्यायालयाच्या आदेशानंतरही प्रचारसभांमध्ये मास्क, सॅनिटायझर, शारिरीक अंतर राखण्याचे नियम धाब्यावर बसविण्यात आले, याबद्दल न्यायमूर्तींनी नाराजी व्यक्त केली.
निवडणूक असलेल्या राज्यांमध्ये हजारोंच्या सभा झाल्या होत्या, तेव्हा तुम्ही दुसर्या ग्रहावर होतात का, असा सवाल करत न्यायालयाने आयोगाची चांगलीच कानउघाडणी केली. २ मे रोजी होणार्या मतमोजणीदरम्यान तुम्ही काय उपाययोजना केल्या त्याबाबत आराखडा सादर करा, अन्यथा मतमोजणी रोखू असा इशारा न्यायालयाने दिला.