मुंबई – राज्यसभेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले असून शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे भाजपचे 3 उमेदवार विजयी झाले आहेत.
महाविकास आघाडीने तीन तर भाजपनेही 3 जागा जिंकल्या. आज झालेल्या मतदानानंतर दोन्ही बाजूंनी पाच जणांच्या मतपत्रिकेवर आक्षेप घेतल्यानंतर तब्बल नऊ तासानंतर या निवडणुकीच्या मतमोजणीला रात्री दोनला सुरुवात झाली. त्यानंतर चार वाजता सर्व निकाल समोर आले आहे. पहिले मतपत्रिकेची छाननी झाली. त्यात २८४ मतपत्रिका वैध ठरल्या. त्यातून शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचा प्रत्येकी एक असे एकुण महाविकास आघाडीचे तीन तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत पहिल्या फेरीत पाच उमेदवार निवडून आले.
त्यात
संजय राऊत ( शिवसेना) – ४१ ( विजयी )
प्रफुल्ल पटेल( राष्ट्रवादी ) – ४३ ( विजयी )
इम्रान प्रतापगढी ( काँग्रेस ) – ४४ ( विजयी )
पियुष गोयल ( भाजप ) – ४८ ( विजयी )
अनिल बोंडे ( भाजप ) – ४८ (विजयी)
यांचा समावेश आहे. या पहिल्या फेरीत
संजय पवार( शिवसेना) – ३३ व धनजंय महाडिक ( भाजप ) – २६ यांंना मिळाले. पण, दुस-या पसंतीच्या मताचा महाडिक यांना फायदा झाला त्यात त्यांना ४१ मते मिळाली तर शिवसेनेचे संजय पवार हे पराभूत झाले.
आमदार सुहास कांदे यांचे मत बाद
मुंबई – नांदगाव विधानसभेचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत राज्यसभा निवडणुकीत बाद झाले आहे. या निवडणुकीत २८५ मतदान झाले होते. पण, कांदे यांचे मत बाद झाल्यानंतर २८४ मतांची मोजणी करण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. कांदे बरोबरच राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे यशोमती ठाकुर भाजपचे सुधीर मुनगंटीवार, अपक्ष आमदार रवी राणा यांच्या मतावरही आक्षेप घेण्यात आले होते.
पण, यात कांदे वगळून सर्वांवर असलेले आक्षेप फेटाळून लावले. त्यामुळे त्यांचे मत वैध झाले. कांदे यांचे मत हे शिवसेना नेते संजय राऊत यांना दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांचे एक मत कमी झाले आहे. कांदे यांनी मतपत्रिकेची घडी केली नाही. त्याचबरोबर त्यांनी शिवसेनेबरोबरच राष्ट्रवादीच्या प्रतिनिधीला मतपत्रिका दाखवल्याचा आक्षेप त्यांच्यावर होता.