मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक जाहीर केली आहे. महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिल्या जाणाऱ्या विधानपरिषदेच्या ५ जागा सदस्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झाल्या आहेत.
आमदार सर्वश्री आमश्या फुलाजी पाडवी यांचा विधानपरिषद सदस्य म्हणून ७ जुलै २०२८ पर्यंत कालावधी, प्रविण प्रभाकरराव दटके (१३ मे २०२६), राजेश उत्तमराव विटेकर – (२७ जुलै २०३०), रमेश काशिराम कराड – (१३ मे २०२६) आणि गोपीचंद कुंडलिक पडळकर यांचा कार्यकाळ समाप्ती १३ मे २०२६ असा आहे. मात्र, या सदस्यांची दि. २३ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र विधानसभा सदस्य म्हणून निवड झाल्याने भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेकरिता द्वैवार्षिक निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे.
या निवडणुकीसाठी सोमवार, १० मार्च २०२५ रोजी अधिसूचना जारी केली जाईल. सोमवार, १७ मार्च, २०२५ पर्यंत उमेदवारांना नामांकन अर्ज दाखल करता येईल. उमेदवारांनी दाखल केलेल्या नामांकन अर्जांची छाननी मंगळवार, १८ मार्च, २०२५ रोजी केली जाईल, तर नामांकन अर्ज मागे घेण्याची मुदत गुरूवार, २० मार्च, २०२५ अशी आहे. गुरूवार, २७ मार्च, २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत या निवडणुकीसाठी मतदान होईल. तर त्याच दिवशी ५ वाजेनंतर मतमोजणी करण्यात येईल. ही संपूर्ण प्रक्रिया दिनांक २९ मार्च, २०२५ पर्यंत पूर्ण होईल.