मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यातील ३१ जिल्हयांतील एकूण ९५ विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशिन्सच्या बर्न्ट मेमरी आणि मायक्रोकंट्रोलरच्या तपासणी आणि पडताळणीसंदर्भात एकूण १०४ अर्ज प्राप्त झालेले आहेत. या १०४ अर्जांमधून महाराष्ट्र राज्यातील १,००,४८६ मतदानकेंद्रापैकी ७५५ मतदानकेंद्रावरील ईव्हीएम संचाची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्यातील उर्वरित सिंधुदुर्ग, नंदुरबार, अमरावती, वर्धा व गडचिरोली या ५ जिल्हयात ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशिन्सच्या बर्न्ट मेमरी आणि मायक्रोकंट्रोलरच्या तपासणी आणि पडताळणीसंदर्भातील अर्ज प्राप्त झाले नाहीत.
भारत निवडणूक आयोगाने १ जून २०२४, १६ जुलै, २०२४ व ३० जुलै, २०२४ रोजीच्या पत्रांन्वये ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशिन्सच्या बर्न्ट मेमरी आणि मायक्रोकंट्रोलरच्या तपासणी आणि पडताळणीसंदर्भात करावयाच्या कार्यपध्दतीबाबत सूचना दिलेल्या आहेत. ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशिन्सच्या बर्न्ट मेमरी आणि मायक्रोकंट्रोलरच्या तपासणी आणि पडताळणीदरम्यान निवडणूक याचिका दाखल नसलेल्या प्रकरणी प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी पार पडलेली प्रक्रिया पुन:श्च पार पाडली जाते. त्यानुसार, ईव्हीएम-व्हीव्हीपॅटच्या संचातील प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीचा डेटा क्लियर करण्यात येऊन अभिरुप मतदान (मॉकपोल) घेण्यात येते. अंतिमत: सीयु मधील डेटा व व्हीव्हीपॅट मशिन्स मधील स्लीप्स यांच्या आकडेवारीमध्ये तफावतीबाबत निरीक्षण करण्यात येऊन संबंधित संचातील ईव्हीएमचे कामकाज व्यवस्थित असल्याची खात्री करण्यात येते.
३० जुलै, २०२४ रोजीच्या पत्रान्वये ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशिन्सच्या बर्न्ट मेमरी आणि मायक्रोकंट्रोलरच्या तपासणी आणि पडताळणीसंदर्भात उत्पादक कंपनीकडून तपासणीच्या तारखेआधी ३ दिवस पर्यंत अर्जदार त्यांचा तपासणीचा अर्ज कोणत्याही वेळी मागे घेऊ शकतो. त्यानुसार संबंधित अर्जदारास त्याने जमा केलेले शुल्क त्यांना परत करण्याची तरतूद आहे, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.