नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा): सर्वोच्च न्यायालयाकडील रिट पिटीशन क्रमांक 434/2023 अंतर्गत 26 एप्रिल 2024 रोजी पारित केलेल्या आदेशानुसार मतमोजणी पश्चात इव्हीएम मशिनच्या बर्न्ट मेमरी व मायको कंट्रोलर तपासणीची तांत्रिक व प्रशासकीय कार्यपद्धती भारत निवडणूक आयोगाने 1 जून 2024 व 16 जुलै 2024 च्या पत्रानुसार निश्चित केली आहे. या कार्यप्रणालीनुसार इव्हीएम मशीनच्या बर्न्ट मेमरी व मायको कंट्रोलर तपासणीची कार्यवाही पूर्ण करण्यात येणार असून या प्रक्रियेबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकरी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.
अशी आहे इव्हीएम बर्न्ट मेमरी व मायक्रो कंट्रोलर तपासणीची प्रशासकीय व तांत्रिक पद्धती
अ) इव्हीएम च्या बर्न्ट मेमरी व मायक्रो कंट्रोलर तपासणीची प्रशासकीय कार्यप्रणाली खालील प्रमाणे आहे.
- लोकसभा / विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी अंती विजयी उमेदवारानंतर अनुक्रमांक 2 व 3 वर असणारे उमेदवार इव्हीएम च्या बर्न्ट मेमरी व मायक्रो कंट्रोलर तपासणी करिता अर्ज करू शकतात.
- उमेदवाराने मतमोजणीनंतर सात दिवसात जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे Annexure-I या नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे.
- संबंधित उमेदवार विधानसभा मतदार संघ निहाय जास्तीत जास्त एकूण मतदान केंद्र संख्येच्या पाच टक्के इतक्या मर्यादेत इव्हीएम च्या बर्न्ट मेमरी व मायक्रो कंट्रोलर तपासणी करिता अर्ज करु शकतात.
- याकरिता प्रति इव्हीएम सेट साठी 40 हजार अधिक 18 टक्के जीएसटी इतके शुल्क भारत निवडणूक आयोगाने निश्चित करुन दिलेले आहे.
- इव्हीएम सेट मध्ये बीयू/सीयू व व्हीव्ही पॅट यांचा एकत्रित समावेश होतो. उमेदवार त्यांचे पसंतीनुसार मतदान केंद्राचे सीयू/बीयू व व्हीव्हीपॅट यांची निवड करु शकतात.
- मतमोजणीनंतर सात दिवसात जिल्हयात प्राप्त अर्ज जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या स्तरावरुन पुढील पाच दिवसात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येतील.
- जिल्हा निहाय अर्ज एकत्रित करुन संपूर्ण राज्यातील इव्हीएम पडताळणीचे अर्ज मतमोजणीपासून तीस दिवसात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून भारत निवडणूक आयोगाकडे व BEL / ECIL कंपनीकडे पाठविण्यात येतील.
- लोकप्रतिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 81 नुसार निवडणूक याचिका दाखल करण्याचा कालावधी निकाल जाहीर केल्यापासून 45 दिवस आहे. ज्याप्रकरणी निवडणूक याचिका सक्षम न्यायालयात दाखल नसतील अशा प्रकरणी मा.न्यायालयाकडून खातरजमा झाल्यानंतर 10 दिवसांत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने BEL/ECIL यांना अवगत करणे आवश्यक आहे.
- ज्याप्रकरणी निवडणूक याचिका दाखल असतील अशा प्रकरणी संबंधित अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मा.न्यायालयाकडून इव्हीएम च्या बर्न्ट मेमरी व मायक्रो कंट्रोलर तपासणीची परवानगी घेणे आवश्यक राहील.
- तद्नंतर दोन आठवडयाचे आंत BEL/ECIL कंपनीकडून जिल्हा निहाय इव्हीएमच्या बर्न्ट मेमरी व मायक्रो कंट्रोलर तपासणीचे वेळापत्रक कळविण्यात येईल.
- त्यानुसार जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडून किमान पाच दिवस अगोदर संबंधित उमेदवारांना कळविण्यात येईल.
- सदर वेळापत्रकानुसार BEL/ECIL कंपनीच्या अभियंत्यांच्या उपस्थितीत संबंधित उमेदवारांसमक्ष इव्हीएम च्या बर्न्ट मेमरी व मायक्रो कंट्रोलर तपासणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.
ब) इव्हीएम च्या बर्न्ट मेमरी व मायक्रो कंट्रोलर तपासणीची तांत्रिक कार्यप्रणाली खालील प्रमाणे आहे.
- संबंधित उमेदवार प्रत्यक्ष तपासणीच्या दिवशी 10 वाजेपूर्वी त्यांचे पसंतीनुसार पाच टक्के मर्यादेत विहीत शुल्क भरणा केल्याप्रमाणे मतदान केंद्र संख्येनुसार ईव्हीएम सेट निवडू शकतात.
- यामध्ये वेगवेगळया मतदान केंद्राचे बीयू/सीयू व व्हीव्हीपॅट निवडून एक सेट तयार करण्याची मुभा देखील उमेदवारांना देण्यात आलेली आहे.
- इव्हीएम सेट मधील बीयू/सीयू व व्हीव्हीपॅट वेगवेगळया क्रमाने जोडण्याची मुभा देखील उमेदवारांना देण्यात आलेली आहे.
- उमेदवारांसमक्ष इव्हीएम जोडणी केल्यानंतर सीयू सुरु करण्यात येईल. तद्नंतर ईव्हीएम यंत्राची स्वयंपडताळणीची प्रक्रिया त्वरीत सुरु होते. ज्यामध्ये बीयू/सीयू व व्हीव्हीपॅट बद्दल महत्वाच्या बाबी सीयू वरील डिस्प्लेवर दिसतात.
- ईव्हीएम यंत्रांची स्वयंपडताळणी संपल्यानंतर त्यामध्ये परस्पर खातरजमा प्रक्रीया साधण्यात येते. जेणेकरून बीयू/सीयू/ व्हीव्हीपॅट वगळता अन्य कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण इव्हीएम सेट मध्ये जोडलेले नाही याची खात्री केली जाते.
- अभिरुप मतदान – डमी मतपत्रिका ईव्हीएमवर लावून संबंधित उमेदवारांना / प्रतिनीधींना जास्तीत जास्त 1 हजार 400 इतक्या मतांचा मॉकपोल (अभिरुप मतदान) त्यांच्या पसंतीक्रमानुसार करण्याची मुभा राहील.
- उमेदवार किंवा प्रतिनीधी यांनी अभिरुप मतदान करण्यास नकार दिल्यास BEL/ECI अभियंताकडून 1 हजार मतांचा मॉकपोल करण्यात येईल.
- अभिरुप मतदान पूर्ण झाल्यानंतर संबंधित उमेदवार यांच्या समक्ष व्हीव्हीपॅट मधील स्लीप काढून त्यांची मोजणी करुन दाखविण्यात येईल. व उमेदवारांनी केलेल्या अभिरुप मतदानाची उमेदवार निहाय सीयू मधील आकडेवारी आणि डमी उमेदवारनिहाय व्हीव्हीपॅट स्लीप्स यांची परस्पर पडताळणी करुन दाखविण्यात येईल.
- ईव्हीएम पडताळणीच्या संपूर्ण प्रक्रियेचे सीसीटीव्ही व्दारे रेकॉर्डिंग करण्यात येईल.