इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महाराष्ट्रातील एकूण २८८ जागांपैकी सुमारे एक चतुर्थांश विधानसभेच्या जागा सत्तेसाठी टर्निंग पॉइंट ठरू शकतात. गेल्या निवडणुकीत ७३ विधानसभा जागांवर विजय आणि पराभवाचा फरक दहा हजारांपेक्षा कमी होता. अशा परिस्थितीत या ७२ जागांवर काही मते इकडे-तिकडे वळवली तर संपूर्ण खेळच बिघडू शकतो. पाच जागांवर विजय-पराजयाचे अंतर एक हजार मतांपेक्षा कमी होते, तर चार जागांवर विजय-पराजयाचे अंतर एक हजार ते दोन हजार मतांचे होते. २८ जागांवर विजय-पराजय २ हजार ते ५ हजारांचा फरक होता. ३६ जागा अशा होत्या, जिथे पाच ते १० हजार मतांचा फरक होता.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपप्रणित ‘एनडीए’ आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया’ आघाडी (महायुती विरुद्ध महाविकास आघाडी) यांच्यात लढत होत आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात केवळ ०.७ टक्क्यांचा फरक होता. अशा परिस्थितीत विधानसभा निवडणुकीत २ ते ३ टक्के मतांचा स्विंग कोणत्याही महायुती किंवा महाविकास आघाडीचा खेळ करू शकतो. गेल्या पाच वर्षांपूर्वी दहा हजारांपेक्षा कमी मतांनी निवडून आलेल्या ७३ जागांवर राजकीय पक्षांनी अधिक लक्ष्य केंद्रीत केले होते. या जागा तसेच बंडखोर राज्यातील निवडणुकीचे चित्र बदलवू शकतात.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सत्ताधारी महायुतीवर वरचष्मा होता. महाविकास आघाडीला ३१ तर महायुतीला १७ जागांवर समाधान मानावे लागले. लोकसभा निवडणुकीच्या निकालानुसार महाविकास आघाडी १६० जागांवर, तर महायुती १२८ जागांवर आघाडीवर आहे. महायुती आणि महाविकास आघाडीला मिळालेल्या मतांमध्ये विदर्भात काँग्रेस आणि उत्तर महाराष्ट्रात भाजप पुढे होता. काँग्रेस-उद्धव-शरद पवार जोडीला पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याने साथ दिली. कोकणात शिंदे-भाजपचे वर्चस्व दिसून आले. मुंबईच्या जागांवर दोन्ही आघाड्यांमध्ये तुल्यबळ लढत होती.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात निवडणुकीचा मार्ग कठीण झाला आहे. या वेळी विधानसभेच्या निवडणुकीत असा एकही मुद्दा नव्हता, की ज्याद्वारे संपूर्ण राज्यातील सर्व विधानसभा जागांवर परिणाम होऊ शकेल. त्यामुळे घोषणाबाजीबाबतही संशय व संभ्रमाची स्थिती आहे. ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक हैं तो सुरक्षित हैं’ अशा घोषणा देत भाजपने नॅरेटिव्ह मांडण्याचा प्रयत्न केला; पण ‘एनडीए’च्या घटक पक्षांतही त्यावरून कमालीचे मतभेद दिसले. अजित पवारच नव्हे, तर भाजपच्या अनेक नेत्यांनीही ही घोषणा नाकारणार असल्याचे सांगितले. या वेळच्या निवडणुकीच्या रणसंग्रामाचे स्वरूपही बदलले आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात बहुरंगी लढत होत आहे. या पक्षांचे बंडखोर उमेदवारांनी अनेक ठिकाणी निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची झोप उडवली आहे. अशा स्थितीत कोणाची कोण बाजी मारणार, याबाबत त संभ्रम आहे.
गेल्या निवडणुकीच्या निकालांवर नजर टाकली, तर कमी फरकाने ७३ जागांपैकी २८ जागांवर भाजपने विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसने १५, काँग्रेसने १२ आणि शिवसेनेने ५ जागा जिंकल्या. याशिवाय १३ जागा इतर पक्ष आणि अपक्षांनी जिंकल्या.