इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या असल्या तरी शिवसेनेकडून छुप्या मार्गाने प्रचार केला जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्षाच्या विरोधात काँग्रेसने तक्रार दाखल केली आहे. निवडणूक आयोगाने तत्काळ दखल घेत २४ तासाच्या आत आपले म्हणणे मांडण्याचे आदेश शिंदे यांना दिले आहे. त्यामुळे आता या सर्व प्रकरणाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या वतीने मराठी माध्यमाच्या सिरीयलमध्ये पक्षाच्या जाहिराती केल्या जात असल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. या संदर्भातली तक्रार काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यांच्या या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने तत्काळ दाखल घेत २४ तासात शिंदे यांना म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत. त्या संदर्भातील पत्रक जारी करण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाच्या या पत्रानंतर आता सावंत यांनी या प्रकरणात तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. हे प्रकरण म्हणजे ‘पेड न्यूज’चाच एक प्रकार असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे. त्यामुळे केवळ निवडणूक आयोगाच्या नोटीसीने काहीही होणार नाहीस तर शिंदे यांच्या पक्षाच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही मराठी वाहिन्यांवर मराठी सिरीयल सुरू आहेत. या सिरीयलच्या माध्यमातून शिंदे यांच्या पक्षाचा प्रचार केला जात आहे; मात्र या संदर्भातला खर्च निवडणूक खर्चामध्ये दाखवण्यात आलेला नाही. त्यामुळे हा ‘पेड न्यूज’चा प्रकार असल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.