नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा): महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया सुरू होण्याच्या शेवटच्या ४८ तास आगोदर प्रचारासाठीच्या घेंतलेल्या सर्व परवानग्या संपुष्टात येणार असून जिल्हादंडाधिकारी जलज शर्मा यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये प्रचार कालावधी संपल्यांनतर मतदार संघातील प्रचारावर आदर्श आचार संहितेचे निर्बंध आदेश जारी केले आहेत. सदर आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत) अंमलात राहतील.
यानुसार मतदान पूर्ण होण्याचा कालावधी संपण्यापूर्वी ४८ तासांदरम्यान ध्वनिक्षेपकाच्या वापरास परवानगी दिली जाणार नाही. निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक यांनी निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात आलेले फलक ( पोस्टर, बॅनर, कमानी, रस्त्यांवरील दृकश्राव्य जाहिरात), झेंडे, भोंगे/ ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धके व इतर प्रचार साहित्य स्वखर्चाने काढून घेणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधी अधिनियम, 151 चे कलम 126 नुसार 18 नोव्हेंबर 2024 रोजी सांयकाळी 6.00 वाजेनंतर वर्तमानपत्र, दूरचित्रवाणी, समाज माध्यमे, रेडीओ व इतर प्रसार माध्यमे यावर राजकीय प्रचारासाठी बंदी असणार आहे.
वरील बाबींचे अनुपालन शक्य व्हावे यादृष्टीने या बाबी सर्व राजकीय पक्ष, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांना निवडणूक निर्णय अधिकारी/ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांच्या विभागाकरीता निदर्शनास आणून देणे आवश्यक आहे. प्रत्येक ईसमावर हे आदेश तालीम करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर निवडणूक निर्णय अधिकारी/ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर करून त्यास प्रसिद्धी करावी. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरूद्ध भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 223 अन्वये कारवाई केली जाईल असेही जिल्हादंडाधिकारी श्री. शर्मा यांनी आदेशित केले आहे.