इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जयपूरः राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील सामरावता गावात बुधवारी झालेल्या हिंसाचारानंतर तणावाचे वातावरण आहे. गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गाव आणि परिसरात पोलिसांची पथके गस्त घालत आहेत. आमदार नरेश मीणा यांच्या समर्थक आणि पोलिसांमध्ये जोरदार हाणामारी झाली. मीणा यांच्या समर्थकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचा आरोप आहे. जाळपोळ झाली. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि हवेत सुमारे १०० राउंड फायर केले.
दरम्यान, हल्लेखोरांनी दुचाकी आणि कार पेटवून दिल्या. दगडफेकीत १०० हून अधिक दुचाकी आणि चारचाकी वाहने जाळली. त्याचबरोबर आ. मीणा यांच्या ६० समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नरेश मीणाविरुध्द नगरकोट पोलिस ठाण्यात आतापर्यंत ४ गुन्हे दाखल आहेत. या हिंसाचारात अनेक गावकरी जखमीही झाले आहेत. राजस्थानमध्ये बुधवारी विधानसभेच्या सात जागांसाठी मतदान झाले. देवल उनियारा ही जागा यापैकी एक आहे. नरेश मीणा हे येथून अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. दरम्यान, सामरावता गावात मतदानादरम्यान मीणा यांनी निवडणुकीत हेराफेरीचा आरोप केला. ईव्हीएमवरील आपले निवडणूक चिन्ह अस्पष्ट असल्याचा आरोप त्यांनी केला.
आ. मीणा यांनी मतदान केंद्रावर मतदान केंद्रप्रमुख अमित चौधरी यांना थप्पड मारली. त्यावर पोलिसांनी मीणा यांना ताब्यात घेतले. दरम्यान, रात्री मीणा यांच्या समर्थकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या निवडणुकीपूर्वी मीणा काँग्रेसमध्ये होते; मात्र पक्षाविरोधात बंडखोरी करत त्यांनी या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. सामरावता गावात सुमारे दीड तास गोंधळ घातला. त्याच्या खुणा आजही गावात पाहायला मिळतात.
जळालेल्या मोटारसायकली आणि जीप गाड्या अजूनही गावात आहेत. सध्या पोलिस नरेश मीना यांचा शोध घेत आहेत. घरासमोरच्या वाहनांची आणि इमारतींचीही तोडफोड करण्यात आली आहे. आ. मीणा यांनी गावातील लोकांसह रात्रभर धरणे आंदोलन करण्याची तयारी केली होती. त्यासाठी आजूबाजूच्या गावातून पोरांनाही बोलावण्यात आले. हिंसाचाराच्या घटनेनंतर संपूर्ण समरवाटा गावात दहशतीचे वातावरण आहे.