नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जम्मू आणि काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज शांततेत आणि उत्सवी वातावरणात मतदान पार पडले. या निसर्गरम्य प्रदेशातील मतदान केंद्रांवर संयमाने रांगेत उभे असलेल्या मतदारांची दृश्ये, लोकांचा लोकशाहीवरील दृढ विश्वास अधोरेखित करतात.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, “जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकांमधून लोकशाहीची महत्त्वपूर्ण प्रगल्भता दिसून आली आहे जी इतिहासाच्या पानांमध्ये प्रतिध्वनित होईल आणि पुढील अनेक वर्षांसाठी या प्रदेशातील लोकशाही भावनांना प्रेरणा देत राहील. त्यांनी या निवडणुका जम्मू-काश्मीरमधील जनतेला समर्पित केल्या आणि लोकशाही प्रक्रियेवरील त्यांचा विश्वास आणि निर्धाराची दखल घेतली. शांततापूर्ण आणि सर्वांचा सहभाग असलेल्या या निवडणुका ऐतिहासिक आहेत, जिथे जम्मू आणि काश्मीरमधील लोकांच्या इच्छेनुसार लोकशाही पूर्वीपेक्षा अधिक खोलवर रुजत आहे.” तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील 40 जागांसाठी आज सकाळी 7 वाजता सुरू झालेले मतदान कोणत्याही हिंसाचाराच्या घटनांशिवाय शांततेत पार पडले. सायंकाळी 7 वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर 65.58% मतदानाची नोंद झाली.
पार्श्वभूमी
तिसऱ्या टप्प्यात, 7 जिल्ह्यांमधील 40 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदारांसाठी उभारण्यात आलेल्या 5060 मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. निवडणुकीच्या या टप्प्यात 387 पुरुष आणि 28 महिला उमेदवारांसह एकूण 415 उमेदवार रिंगणात होते. तिसऱ्या टप्प्यात मतदान झालेले सात जिल्हे आहेत- बांदीपोरा, बारामुल्ला, जम्मू, कथुआ, कुपवाडा, सांबा आणि उधमपूर. टप्पा -1 आणि टप्पा -2 मध्ये अनुक्रमे 61.38% आणि 57.31% मतदान झाले. मतमोजणी 8 ऑक्टोबर 2024 रोजी होणार आहे.