इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारत विविध प्रकारच्या जाती आणि धर्मांच्या नागरिकांनी बनलेला देश आहे, तसेच या देशात अति श्रीमंत, श्रीमंत, मध्यमवर्गीय, गरीब आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेले नागरिकही राहतात. इतकेच नव्हे तर त्यांच्याकडे काहीच नाही असे अनाथ आणि भिकारी देखील या देशात राहतात, असे म्हटले जाते.
यातील भिकारी हे रेल्वे, सार्वजनिक ठिकाणी किंवा मंदिरांच्या बाहेर मागताना दिसतात. विशेष म्हणजे या ठिकाणी येणारे भाविक या भिकाऱ्यांना पैसे देतात. काही वर्षांपूर्वी दक्षिण भारतातील एका शहरात अशाच एका भिकार्याकडे कोट्यावधी रुपयांच्या नोटा आणि नाणी सापडली होती. आता देखील अशीच एक महिला भिकाऱ्याची चर्चा सुरू झाली असून विशेष म्हणजे तिने ज्या मंदिरा बाहेर बसून भीक मागितली, त्या मंदिरालाच एक लाख रुपयांची देणगी दिली आहे, त्यामुळे तिची सर्वत्र चर्चा होत आहे.
कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील मंदिरांच्या दारात भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या 80 वर्षीय वृद्ध महिलेने येथील राजराजेश्वरी मंदिराला 1 लाख रुपयांची देणगी दिली आहे. मंदिर प्रशासनाने ही माहिती दिली. उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर तालुक्यातील गंगोलीजवळील कांचागोडू गावात अश्वथम्मा रहिवासी राहते. 18 वर्षांपूर्वी तिच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर ती विविध मंदिरांजवळ भिक्षा मागत असते. एका छोट्याशा झोपडीत ती निवास करते.
विशेष म्हणजे, अश्वथम्मा ही स्वतःवर अत्यल्प खर्च करते. आणि बाकीची रक्कम बँकेत ठेवते. जी मंदिरे आणि धर्मादाय कार्यासाठी देणगीसाठी वापरली जाते. राजराजेश्वरी मंदिरासमोरील वार्षिक उत्सवादरम्यान महिलेने एका महिन्यात भिक्षा मागून तब्बल एक लाख रुपये मंदिरात जमा केले आहेत.








