इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मुलाकडे ३० कोटींची संपत्ती… नातू आयएएस अधिकारी… पण, वृद्ध दाम्पत्याला दोनवेळच्या जेवणाची भ्रांत… अखेर या दाम्पत्याने आपले जीवन संपवले…. ही धक्कादायक घटना आहे हरियाणातील… या घटनेने संपूर्ण देश हळहळला आहे. या दाम्पत्याने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, आमच्याशी जे केले त्याची शिक्षा सरकारने आणि समाजाने त्यांना द्यावी.
हरियाणातील चरखी दादरी जिल्ह्यातील बधडा भागातील गोपी गावातील ही घटना आहे. येथे करोडपती मुलगा आणि सून दोन वेळची भाकरी देऊ शकत नसल्याने वृद्ध आई-वडिलांनी विषारी द्रव्य प्राशन करून जीवन संपवले. वृद्ध दाम्पत्याचा नातू आयएएस अधिकारी आहे. वडिलांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, मुलगा आणि सुनेने आमचा छळ केला. त्याआधारे पोलिसांनी मुलगा आणि दोन सुनांसह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
निवृत्त लष्करी कर्मचारी जगदीशचंद (७८) आणि भागली देवी (७७) मूळचे गोपी गावचे रहिवासी बधडा येथे त्यांचा मुलगा वीरेंद्र यांच्याजवळ राहत होते. वीरेंद्र आर्य यांचा मुलगा विवेक आर्य २०२१ मध्ये आयएएस अधिकारी झाला. सध्या तो कर्नाल येथे प्रशिक्षणार्थी IAS म्हणून कार्यरत आहे. जगदीशचंद आणि त्यांची पत्नी भागली देवी यांनी बुधवारी रात्री त्यांच्या बधडा राहत्या घरी विषारी पदार्थ खाऊन आत्महत्या केली. मध्यरात्री अडीचच्या सुमारास जगदीशचंद यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला सांगितले की, त्यांनी विष प्राशन केले आहे. पोलिस आल्यानंतर जगदीशचंद यांनी सुसाईड नोट पोलिसांना दिली. प्रकृती बिघडल्याने दोघांनाही रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले.
अशी आहे सुसाईड नोट
सुसाईड नोटमध्ये जगदीशचंद यांनी लिहिले आहे की, मी माझा लहान मुलगा महेंद्र याच्यासोबत राहत होतो. सहा वर्षांपूर्वी त्याचे निधन झाले. महेंद्रची पत्नी नीलम हिने मला काही दिवस जेवण दिले, मात्र नंतर तिने अनैतिक कृत्ये सुरू करून गावातील विकास याला सोबत घेतले. विकासला माझ्याजवळ ठेवण्यास मी हरकत घेतली. त्यानंतर त्यांनी मला मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले. यानंतर मी दोन वर्षे अनाथाश्रमात राहिलो. तो परत आल्यावर त्याला पुन्हा बाहेर काढून घराला कुलूप लावले. त्याच काळात माझी पत्नी भागलीदेवी हिला अर्धांगवायू झाला.
अखेर दुसरा मुलगा वीरेंद्रसोबत आम्ही राहू लागला. त्यानेही आम्हाला सांभाळण्यास नकार दिला. ते मला शिळे अन्न खायला द्यायचे. किती तरी दिवस मी हे सर्व सहन केले. पण, आता संयम संपला आहे. माझ्या मृत्यूचे कारण म्हणजे नीलम, विकास, सुनीता आणि वीरेंद्र. या चौघांनी माझ्यावर एवढा अन्याय व अत्याचार केला की, असे कोणत्याही मुलाने आपल्या आई-वडिलांवर करू नये. त्यामुळे माझ्या नावे असलेली जमीन मी आर्य समाजाला दिली आहे.
सुसाईड नोटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, माझ्या मुलांची बधडा येथे ३० कोटींची मालमत्ता आहे, पण मला द्यायला त्यांच्याकडे दोनवेळची भाकरीही नाही. त्यांनी आमच्याशी जे केले त्याची शिक्षा सरकारने आणि समाजाने त्यांना द्यावी. तरच त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. या वृद्धाने सुसाईड नोटमध्ये आपल्या दोन बँक ठेवी आणि दुकाने आर्य समाज बधडा यांच्या नावे केली आहे.
मुलगा वीरेंद्र म्हणतो…
आई-वडिलांनी आत्महत्या केल्यानंतर मुलगा वीरेंद्र आर्याने सांगितले की, त्यांचे दोन भाऊ राजेंद्र आणि महेंद्र यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्याचे आई-वडील खूप नाराज असायचे. दोन वर्षांपासून त्रस्त राहून त्यांनी जीवन संपवले. आम्ही मेदांता, आर्यन आणि इतर हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले पण उपयोग झाला नाही.
वृद्धाच्या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये जगदीशचंद यांचा मुलगा वीरेंद्र आर्य, सून सुनीता, सून नीलम आणि नातेवाईक विकास यांच्या नावाचा समावेश आहे. तपासात जे तथ्य समोर येईल त्याआधारे पुढील कारवाई केली जाईल. असे पोलिस अधिकारी वीरेंद्र सिंग यांनी सांगितले आहे.
https://twitter.com/sainidan_ratnu/status/1641717492124102656?s=20
Elderly Couple Commit Suicide in Haryana