नवी दिल्ली – वृद्ध आणि दिव्यांग नागरिकांच्या सोयीसाठी घराजवळील कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्रांसंदर्भात (एनएचसीव्हीसी) राज्ये, केंद्रशासित प्रदेशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात, अशी शिफारस कोविड -19 लसीकरणासाठीच्या राष्ट्रीय तज्ञ गटाने केंद्रीय मंत्रालयाच्या तांत्रिक तज्ञ समितीच्या प्रस्तावावर केली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देखील या मार्गदर्शक सूचना स्वीकारल्या आहेत. वृद्ध आणि दिव्यांग नागरिकांसाठी समुदायाधारित, सुलभ आणि लोककेंद्रित दृष्टीकोनाचा अवलंब करत त्यांच्या सोयीसाठी कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्रे त्यांच्या घराच्या अगदी जवळ आणली जात आहेत.
शारीरिक दुर्बलतेमुळे, वयोमानामुळे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग नागरिकांच्या हालचालींवरील मर्यादा लक्षात घेत त्यांचेही लसीकरण होईल, याची खातरजमा करणे, हे तांत्रिक तज्ज्ञ समितीच्या शिफारशींचे उद्दिष्ट आहे. परिचालनसंबंधी मार्गदर्शक तत्त्वे आणि वेळोवेळी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व आवश्यक खबरदारी घेत आणि सुरक्षा उपायांचे पालन करून या समुदायाच्या जवळ लसीकरण सेवा सुरू करून त्यांची उपलब्धता वाढविण्याची गरज या शिफारशींमध्ये नमूद करण्यात आली आहे.
घरा जवळील ही कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्रे विशेषतः खाली नमूद केलेल्या नागरिकांसाठी चालवली जातील तर विद्यमान कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्रांवर इतर सर्व वयोगटासाठीचे लसीकरण सुरू राहील.
एनएचसीव्हीसी येथे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणासाठी पात्र नागरिकांमध्ये पुढील व्यक्तींचा समावेश असेल :
-
लसीकरण न झालेले किंवा पहिली मात्रा घेतलेले ६० वर्षांवरील सर्व नागरिक
-
प्रतिकुल शारिरीक किंवा वैद्यकीय परिस्थितीमुळे दिव्यांग असलेले ६० वर्षांखालील सर्व नागरिक
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सविस्तर मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
या मार्गदर्शक सूचनांनुसार :
-
समुदायाधारित दृष्टीकोन बाळगत समुदाय केंद्र , निवासी कल्याण संघटना केंद्र, गट गृहनिर्माण संस्था केंद्र/ कार्यालय, पंचायत घर, शालेय इमारती, वृद्धाश्रम अशा आरोग्य सुविधा उपलब्ध नसलेल्या तसेच घराच्या जवळ असलेल्या ठिकाणी ही लसीकरण सत्रे आयोजित करता येतील.
-
जिल्हा कृती दल (डीटीएफ) / शहरी कृती दल (यूटीएफ) हे, पात्र लोकसंख्येच्या निकषावर, निर्धारित लोकसंख्येपर्यंत जास्तीत जास्त सेवा पोहोचविण्यासाठी तसेच विद्यमान आरोग्य सेवेवर कमीतकमी परिणाम व्हावा हे लक्षात घेत आणि लसीचा अपव्यय कमी करण्याच्या दृष्टीने योग्य असे संबंधितांच्या घराजवळील लसीकरण केंद्रांचे स्थान निश्चित करतील.
-
लसीकरणासाठी एनएचसीव्हीसीला विद्यमान लसीकरण केंद्राशी- सीव्हीसीशी जोडले जाईल; सीव्हीसी प्रभारी हे लस पुरवठा, इतर सामुग्री आणि लसीकरणासाठी आवश्यक मनुष्यबळ प्रदान करण्यासाठी जबाबदार असतील.
-
सामुदायिक गट आणि निवासी कल्याण संघटनाच्या सहकार्याने एनएचसीव्हीसीसाठी आधी जागा निश्चित केली जाईल. पुरेशी जागा असल्याची खातरजमा करून पंचायत भवन, उप-आरोग्य केंद्रे आणि वेलनेस सेंटर, सामुदायिक सभागृहे, निवासी कल्याण संघटनांचा परिसर, मतदान केंद्रे, शाळा इत्यादी ठिकाणांची निवड करता येईल. निर्धारित गटासाठी प्रवेश करण्याची योग्य सोय असलेले लसीकरण कक्ष आणि प्रतीक्षालयाची व्यवस्था असावी. उदाहरणार्थ केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरणानंतरच्या ३० मिनिटांपर्यंत जिथे थांबायचे, त्या प्रतीक्षालयात पोहोचण्यासाठी व्हीलचेअरसाठी रॅम्पची सोय तसेच निरीक्षण कक्षाची सुविधा असावी.
-
सीव्हीसीसाठीच्या निकषांची पूर्तता झाली आणि त्यांना मान्यता मिळाली की त्यानंतर अशी सर्व ठिकाणे एनएचसीव्हीसी म्हणून कोविन पोर्टलवर नोंदणीकृत केली जातील .
-
स्थानिक परिस्थिती आणि गरजा लक्षात घेऊन आवश्कतेनुसार बदल स्वीकारून एनएचसीव्हीसीमधे लसीकरणाचे नियोजन करणे आणि अंमलबजावणी याकरता डीटीएफ / युटीएफ जबाबदार असतील.
-
एनएचसीव्हीसीतील प्रत्येक गटात पाच सदस्य असतील – गट प्रमुख (डॉक्टर असावा), लसीकरण करणारा, लसीकरण अधिकारी १ को-विन नोंदणीसाठी आणि / किंवा लाभार्थ्यांच्या पडताळणीसाठी, आणि लसीकरण अधिकारी -२ आणि ३ गर्दी नियंत्रणासाठी, तसेच लसीकरणानंतर लाभार्थ्यांचे 30 मिनिटांचे निरीक्षण करण्यासाठी कोणत्याही एईएफआय आणि इतर कोणत्याही सहाय्यासाठी लसीकरण सहाय्यक.
-
वृद्धाश्रमासारख्या एकाच छताखाली लक्ष्यित लाभार्थींचा समूह असतील, अशा वेळी मार्गदर्शक सूचनांनुसार त्या ठिकाणी एनएचसीव्हीसी आयोजित केले जाऊ शकते.
मार्गदर्शक सूचनांमध्ये पुढील तपशीलाचा सुद्धा समावेश आहे:
-
लाभार्थ्यांची नोंदणी आणि नियुक्ती – एकतर आगाऊ केलेली असावी, प्रत्यक्ष केंद्रावर किंवा कोविनवर नोंदणी केलेली असावी
-
इथे लाभार्थ्यांची नोंद होईल
-
एनएचसीव्हीसी केंद्रावर त्यांची ओळख पटवली जाईल, विद्यमान सीव्हीसी केंद्रात त्यांची नोंद होईल
-
एनएचसीव्हीसी केंद्रात लसीकरण सत्रांसाठी सूक्ष्म नियोजन
-
ज्येष्ठ नागरीक तसेच विशेष गरज असलेल्या गटासाठी गरजेनुसार वाहतुकीची सोय
-
ज्येष्ठ नागरीक तसेच विशेष गरज असलेल्या गटासाठी लसीकरण केंद्रात अनुकुल वातावरण निर्मिती
सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या शिफारसींची दखल घ्यावी आणि देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत त्यांचे सविस्तर नियोजन तसेच प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी त्वरित आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत.