मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिंदे गटाने उठाव केल्यानंतर खिंडार पडलेल्या उद्धव सेनेला गतवैभव प्राप्त करून देण्याची जबाबदारी ज्यांच्यावर दिली होती त्यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला आहे. संघटनेच्या बांधणीत मास्टरकी असलेले मारुती साळुंके यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
गेल्यावर्षी जूनमध्ये एकनाथ शिंदे व त्यांच्या समर्थित आमदारांनी शिवसेनेत उठाव करीत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. न्यायालयीन लढाई लढले. आयोगातून पक्षचिन्ह आणि पक्षाचं नाव मिळवलं. अद्याल न्यायालयीन लढाई संपलेली नाही. पण या संपूर्ण परिस्थितीत पक्षसंघटना तळागाळापासून मजबूत करण्यासाठी मारुती साळुंखे या कट्टर शिवसैनिकावर जबाबदारी सोपविण्यात आली होती. मारुती हे ठाकरे गटाचे सचिव व खासदार अनिल देसाई यांचे अत्यंत निकटवर्तीय. त्यामुळे ते पक्ष सोडून जातील, असा कुणी विचारही केलेला नसेल.
विशेष म्हणजे शिवसेनेच्या आतल्या गोटातील माहिती ठेवण्यापासून ते प्रशासकीय कामकाज कसे चालते येथपर्यंत त्यांचा हातखंडा होता. त्यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. आता याच कामांची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मारुती साळुंखे यांच्यावर सोपवली आहे. संघटनेची अचूक बांधणी करणारा कार्यकर्ता मिळाल्याने शिंदे गटाला पक्ष वाढीसाठी फायदा होणार आहे, असे बोलले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थान त्यांचा पक्ष प्रवेश झाला. पक्ष प्रवेशाच्या वेळी शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचीही उपस्थिती होती.
म्हणून होती नाराजी
ठाकरे गटाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्याने मारुती साळुंखे नाराज होते. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालणाऱ्या पक्षाने हे पाऊल उचलल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली होती. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांवर चालणाऱ्या पक्षात जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
दुसरा पर्याय नव्हता
बाळासाहेब ठाकरे यांचे विचार खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जायचे असतील तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत जाण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे शिंदे गटात जाहीर प्रवेश करण्याचा आपण निर्णय घेतल्याचे मारुती साळुंखे यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार आणि सचिव अनिल देसाई यांचे निकटवर्तीय तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची संघटना आणि प्रशासकीय कामातील माहितगार मारुती साळुंखे यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मारुती साळुंखे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे पक्षाची नव्याने बांधणी करण्याच्या कामाला बळ मिळणार आहे. तसेच वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेली संघटना तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी त्यांचा मोठा उपयोग होणार आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार आणि सचिव अनिल देसाई यांचे निकटवर्तीय तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची संघटना आणि प्रशासकीय कामातील माहितगार मारुती साळुंखे यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी… pic.twitter.com/CUXxNxNK1D
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 30, 2023
Eknath Shinde Shivsena Politics Uddhav Thackeray