ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द पाळला नाही, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून वारंवार होतो. मात्र, या आरोपात तथ्य नसून अमित शहा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला नव्हता, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाण्यात सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांची प्रकट मुलाखतही घेण्यात आली. या बैठकीत त्यांनी हा गौप्यस्फोट केला. राज्यात 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीला शिवसेना आणि भाजपा एकत्रितपणे सामोरे गेले. मात्र सत्तास्थापनेच्या वेळी मुख्यमंत्रीपदावरून दोघांमध्ये बिनसले. दरम्यान आता शिंदे सरकारची स्थापना झाल्यानंतर देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भाजपाने बंद दाराआड मुख्यमंत्री पदाबाबत शब्द दिला होता का याचा सस्पेंन्स कायम आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. मुख्यमंत्री पदाबाबत असा कोणताही शब्द अमित शाह यांनी दिला नसल्याचे मुख्यमंत्री यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमात सांगितले आहे. ज्या मुद्यावरुन भाजप आणि शिवसेनेची युती संपुष्टात आली त्यावरच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे नेमके कोण खोटे आणि कोण खरे हा प्रश्न कायम आहे. शिवाय बिहारमध्ये कमी संख्याबळ असताना देखील नितीशकुमार यांना मुख्यमंत्री पद दिले गेले होते की असा निर्वाळाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
मातोश्रीवर बंद दाराआड झालेल्या चर्चेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्याला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद देण्याचा शब्द दिला होता, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला. पण तसा कोणताही शब्द दिला नसल्याचे अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर भाजपा नेत्यांनी स्पष्ट केले. परंतु तरीही, भाजपाबरोबर फारकत घेत, शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसशी आघाडी करत सरकार स्थापन केले. पण एकनाथ शिंदे आणि अन्य ५० आमदारांच्या बंडखोरीमुळे ठाकरे सरकार नंतर कोसळले व शिंदे-फडणवीस सरकार आले.
शिंदे म्हणाले की, निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेत काय बोलणी झाली होती, याची मला माहित नव्हती. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यावर मी दिल्लीला गेलो होतो. तिथे पंतप्रधान मोदी व अमित शहांची भेट घेतल्यावर त्यावेळी बंद दाराआड नेमके काय बोलणे झाले हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला. तेव्हा उद्धव ठाकरे यांना कोणताही शब्द दिला नव्हता. उलट आधीचाच फॉर्म्युला कायम ठेवण्यास सांगितले होते, असे दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले.
शाह यांच्या म्हणण्यानुसार आमची कमिटमेंट फायनल असते. आम्ही तिकडे बिहारमध्ये कमी जागा आलेल्या नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केले होते. तुमचे आमदार कमी असतानाही तुम्ंहाला मुख्यमंत्री केले. अशा वेळी आम्ही उद्धव ठाकरे यांना दिलेला शब्द आम्ही का फिरवला असता? कारण जनतेने कौलही आमच्याच बाजूने दिला होता. असा सवालच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची बंद दाराआड चर्चा झाली होती. या चर्तेत अमित शाहांसोबत अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला होता, असा दावा शिवसेनेकडून करण्यात आला होता. पण भाजपने तो दावा फेटाळला आहे.
विशेष म्हणजे या दाव्यावरुन आता शिवसेनेचे बंडखोर नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे शिंदे यांनी भाजपची बाजू घेतलीय. भाजपने बिहारमध्ये शब्द पाळला. नितीश कुमार यांच्या जागा कमी जिंकून आल्यानंतरही त्यांना मुख्यमंत्री केलं. मग महाराष्ट्रात कसा शब्द फिरवणार? आता सांगा कोण खरं बोलतंय? असं विधान करुन शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर अविश्वास दाखवणारं विधान केलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी सांगायचं आणि आपण ऐकायचं ही आपली परंपरा आहे. २०१९ च्या निवडणुकीनंतर त्यांच्यात आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत काय चर्चा झाली ते त्यांनाच माहिती. पण जेव्हा माझी सरकार स्थापन करण्याच्या निमित्ताने भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत भेटीगाठी झाल्या त्यावेळेस मी त्यांना खरं काय ते विचारलं.
मुख्यमंत्री म्हणाले की, जर आम्ही बिहारमध्ये नितीशकुमार यांचे आमदार कमी असताना त्यांना मुख्यमंत्री बनवू शकतो शिवाय तुमचे 50 आणि भाजपाचे 106 असताना आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करु शकतो तर आम्ही शब्द दिला असता का फिरवला असता असे स्पष्टीकरण गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. त्यामुळे अमित शाह यांनी असा कोणताच शब्द ठाकरे यांना दिला नसल्याचे स्पष्ट होते असाच शिंदे यांच्या वक्तव्याचा अर्थ होता.
अडीच वर्ष शिवसेनेचा आणि त्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री असा फॉर्म्युला ठरल्याचे उद्धव ठाकरे हे सातत्याने सांगत आहेत पण मी या सर्व घटनेचा साक्षीदार राहिलेलो आहे. त्यामुळे असा कोणताच फॉर्म्युला ठरला नव्हता असे म्हणत मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला त्यांनी दुजोरा दिला आहे.आकड्यांचा खेळ करता येतो हे लक्षात आल्यानंतर त्यांनी ही भूमिका घेतल्याचे फडणवीसांनी सांगितले आहे. सत्ता स्थापनेस मित्र पक्षाची गरज लागतेच हे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी भूमिका बदलण्यास सुरवात केल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे.
Eknath Shinde on CM Post Uddhav Thackeray Amit Shah
Politics