नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकनाथ शिंदे हे भाजपचे मुख्यमंत्री आहेत. त्यांची हायकमांड दिल्लीत बसलेली आहे. त्यामुळेच ते दिल्लीत भेटी आणि चर्चा करायला गेले आहेत. शिवसेनेची हायकमांड मात्र मातोश्रीत आहे. मंत्रिमंडळ ठरविण्यासाठी सेनेचा मुख्यमंत्री कधीही दिल्लीत जात नाही, असा जोरदार टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल नाशिक ग्रामीणमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट घेतली. आज त्यांनी शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. याचदरम्यान त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला. राऊत यांनी एकनाथ शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, बंडखोर असलेल्या सगळ्यांचे मुखवटे गळून पडत आहेत. शिंदे हे दिल्लीत गेले आहेत तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी करावी की, बेळगावसह सीमाभाग हा केंद्रशासित प्रदेश करावा. सीमाभागात पुन्हा अत्याचार सुरू आहे. तेथील जनतेला दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यास शिंदे यांनी मोदींना गळ घालावी, असे राऊत म्हणाले.
राऊत पुढे म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकारला महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे आहेत. त्यामुळे बंडखोर हे मुंबईचे तुकडे देणार आहेत का? असा खोचक सवालही त्यांनी केला. राष्ट्रपतीपदासाठी भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांना पाठिंबा देण्याचा निर्णय सर्वस्वी उद्धव ठाकरे हे घेतील. त्यांनी जाहीर केल्यानुसार खासदार हे संबंधित उमेदवाराला मदत करतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची रात्री उशीरापर्यंत बैठक चालल्याचे निदर्शनास आले. याबाबत राऊत यांनी टोला हाणला की, अलिकडे रात्री-मध्यरात्री विचारांचं आदान-प्रदान होतं.
Eknath Shinde is BJP Chief Minister Say Shivsena MP Sanjay Raut