मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील राजकीय घडामोडींना अचानक वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीने दिल्लीला निघाले आहेत. हा दौरा अचानक का ठरला, दिल्लीत काय घडणार आहे याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक दोन हिंदी वृत्तवाहिन्यांना मुलाखती दिल्या. त्यात त्यांनी पहाटेच्या शपथविधीविषयी थेट भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यापाठोपाठ शरद पवार यांनीही पत्रकार परिषदेत पहाटेच्या शपथविधी विषयी भाष्य केले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तसेच, राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी वेग घेतला आहे. या सर्व घडामोडीत शिंदे आणि फडणवीस यांना अचानक दिल्लीतून बोलवणे आले आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते दिल्लीला रवाना झाले आहेत. मंत्रिमंडळ विस्तारासह विविध चर्चा सध्या रंगल्या आहेत.
फडणवीस दिल्लीत जाणार
मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सांगितले जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विस्तार होणार आहे. त्यामुळे या विस्तारात फडणवीस यांना स्थान दिले जाणार असल्याच्याही चर्चा आहेत. मात्र, त्यास दुजोरा मिळालेला नाही. फडणवीस यांना केंद्रात घेऊन महाराष्ट्रात आणखी काही राजकीय समीकरणे भाजपद्वारे तयार केले जाणार असल्याच्याही जोरदार चर्चा आहेत.
दरम्यान, फडणवीस यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांचीही राजभवनात भेट घेतली आहे. त्यानंतर ते दिल्लीला रवाना झाले आहेत. राज्यपालांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे समोर आलेले नाही. या सर्व घडामोडी पाहता मोठा निर्णय होणार असल्याचे बोलले जात आहे.