जळगाव – देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून माशासारखे तडफडत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला. यावेळी त्यांनी फडणवीस नेहमी सरकार पडणार असे सांगतात. त्यासाठी वेगवेगळ्या तारखांचे भाकीत करतात. ते ब्राम्हण असल्याने त्यांचं भाकीत खरे ठरेल असे मला वाटत होते. मात्र त्यांचे कोणतेही भाकीत खरे ठरले नाही असा चिमटाही त्यांनी घेतला. खडसे पुढे म्हणाले की, भाजपमध्ये अनेक आमदार नाराज आहे. त्यांची नाराजी कमी करण्यासाठी पुन्हा आपले सरकार येणार असल्याचे फडणवीस सांगत असतात. पण, हे सरकार पडणार नाही आणि देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत असेही खडसे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवरही टीका केली. ते म्हणाले की, रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा केवळ केंद्र सरकारच्या धोरणामुळे आहे. या इंजेक्शनमुळे अनेकांचे जीव संकटात असताना या इंजेक्शनची निर्यात करण्यात येत होती. ही निर्यात करण्यात आली नसती तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती असेही ते म्हणाले. यावेळी ते म्हणाले की, विरोधी पक्षात असताना राज्य सरकार अडचणीत असेल तर मी मदतीची भूमिका घेतली होती. पण, सध्याच्या विरोधी पक्ष नेत्यांकडून ते बघायला मिळत नाही. राजकारण बाजूला ठेवत एकमेकांना सहकार्य करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.