नाशिकरोड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अभियंते आणि अधिका-यांच्या संघर्ष समितीसह महाराष्ट्र राज्य वीज कामगार कंत्राटी संघटना कृती समितीने दोन दिवसाचा संप पुकारताच सोमवारी रात्री संपाच्या पहिल्या दिवशी सुरुवातीच्या काही मिनिटांतच एकलहरे येथील महानिर्मितीच्या वीज निर्मिती केंद्रातील वीज निर्मिती ठप्प झाली. परिणामी विजेच्या उपलब्धतेत घट आल्याने नाशिक जिल्ह्यातील सिन्नर ग्रामीण आणि पिंपळगाव बसवंत भागात लोडशेडिंग करावे लागले. वीज पुरवठा ठप्प झाल्याने या भागातील शेतकरी वर्गाच्या संतापाचा उद्रेक महावितरण अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला सहन करावा लागला.
एकलहरे येथील एका वीज निर्मिती संचातील वीज निर्मिती रात्री ठप्प झाली. रात्रपाळीला कर्मचारीच उपलब्ध न झाल्याने येथील वीज निर्मितीची यंत्रणा कोलमडली. पहाटे प्रशासनाने एक वीज निर्मिती संच सुरु केला परंतु तोही अर्ध्या तासात पुन्हा बंद पडला. त्यानंतर इतर ठिकाणाहून कर्मचा-यांची कुमक मागविण्याचाही प्रयत्न झाला. दुपारी बारा वाजता एक संच कसाबसा पुन्हा सुरु करण्यात आल्याने दुपारी येथून अवघी १०५ मेगावॅट वीज तयार होऊ शकली. जिल्ह्यातील वैतरणा येथील जल विद्युत केंद्रातील दोन्हीही वीज निर्मिती संच बंद झाल्याने येथेही वीज निर्मिती शून्यावर आली.
नाशिक शहरातील काही ठिकाणी वीज पुरवठा विस्कळीत झाला. सातपूर एमआयडीसी भागात विस्कळीत वीज पुरवठ्याचा फटका सर्वात जास्त बसला. उपलब्ध अपुरे मनुष्यबळ आणि वीज निर्मितीत अचानक आलेली घट अशा दुहेरी समस्येचा सामना महावितरण प्रशासनाला करावा लागल्याची माहिती महावितरणच्या नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी दिली. आज संपाच्या दुस-या दिवशी उर्जामंत्र्यांनी वीज कर्मचारी संघटना पदाधिका-यांना चर्चेस बोलाविण्यात आले असले तरी लेखी करारानंतरच संप मागे घेतला जाणार असल्याची माहिती वीज वर्कर्स फेडरेशनचे केंद्रीय उपाध्यक्ष शमशोद्दीन खतीब यांनी दिली.
मागण्या मान्य न झाल्यास दोन दिवशीय संपाला बेमुदत संपाचे स्वरूप येण्याची शक्यता वाढली आहे. परिणामी राज्यातील वीज निर्मिती विस्कळीत होऊन राज्य अंधारात जाण्याची शक्याता देखील निर्माण झाली आहे. सोमवारी कोराडी वीज निर्मिती केंद्रातून अवघी १७०० मेगावॅट वीज निर्मिती होऊ शकली. चंद्रपूर वीज निर्मिती केंद्रातील ५०० मेगावॅटचा संच क्र.६ देखील सोमवारी रात्री एक वाजता बंद झाला होता. दुपारी फ्रिक्वेन्सी देखील ५० हर्ट्झच्यावर पोहोचली होती.