.
नाशिकरोड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– नाशिकच्या एकलहरे विज निर्मिती केंद्रात खाजगी तंत्रज्ञांची कुमक बोलावण्यात आल्याने आमदार सरोज आहिरे यांनी एकलहरे वीज निर्मिती केंद्राच्या मुख्य अभियंत्यांची मंगळवारी चांगलीच कानउघडणी केली. संपकरी वीज कर्माचा-यांची भेट घेण्यासाठी आहिरे एकलहरे येथे आल्या असता त्यांनी मुख्य अभियंत्यांना आंदोलनस्थळी बोलावून घेत याप्रश्नावर जाब विचारात या खाजगी तंत्रज्ञांना केंद्राबाहेर काढण्याचा अल्टीमेटमच दिल्याने आक्रमक कर्मचारी शांत झाले आणि तणावाची परिस्थिती निवळली.
वीज कर्मचा-यांच्या संपाचा मंगळवारी दुसरा दिवस होता. एकलहरे येथील वीज निर्मिती सोमवारी रात्री कर्मचा-यांच्या अभावी ठप्प पडली होती. त्यामुळे एकलहरे वीज निर्मिती केंद्रात खाजगी वीज निर्मिती केंद्रांचे तंत्रज्ञ मागविण्यात आले होते. त्यास संपकरी कर्मचा-यांनी कडक विरोध दर्शविला. संपाच्या दुस-या दिवशी कामगारांनी एकलहरे वीज निर्मिती केंद्राच्या प्रवेशद्वारातून वाहने आत आणण्यास विरोध दर्शविल्याने परिस्थिती अधिक चिघळली. दुपारी आमदार सरोज आहिरे यांनी संपकरी कर्मचा-यांची क्रांती मैदान येथे भेट घेतली आणि त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी मुख्य अभियंत्यांशी संपर्क साधला आणि त्यांना क्रांती मैदान येथे पाचारण केले. खाजगी तंत्रज्ञांना प्रथम केंद्राच्या बाहेर काढा असे थेट आदेशाच आमदार सरोज आहिरे यांनी मुख्य अभियंत्यांना दिले. मुख्य अभियंता नवनाथ शिंदे यांनी देखील वीज निर्मिती संच सुरु ठेवण्यासाठी तात्पुरती आणि नेमकी काय उपाययोजना केली याबद्दल त्यांना माहिती दिली. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे केंद्रीय उपाध्यक्ष एस.आर. खतीब, सुर्यकांत पवार यांनी संघर्ष समितीच्यावतीने कर्मचा-यांच्या समस्या मांडल्या. तत्पूर्वी सकाळी अकरा वाजता खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार योगेश घोलप यांनी संपकरी वीज कर्मचारी वर्गाची क्रांती मैदान येथे भेट घेतली आणि संपाला पाठिंबा दर्शविला. यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला. संपामुळे एकलहरे वीज निर्मिती केंद्रातून सोमवारी दुपारी अवघी १०५ तर मंगळवारी सायंकाळी १४८ मेगावॅट इतकीच वीज निर्मिती होऊ शकली.