जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माजी मंत्री एकनाथ खडसे पुन्हा राष्ट्रवादी शरद पवार गटात दाखल झाले आहे. त्यांनी आपण राष्ट्रवादी सोडलीच नसल्यामुळे भाजपात अधिकृत प्रवेश झालाच नसल्याचा दावा केला आहे. शनिवारी जळगावात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मेळाव्यात खडसेंनी याबाबत भाष्य केले.
लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांचा प्रचार करुन त्यांना निवडुनही आणले. पण, आता विधानसभा निवडणुका जवळ आल्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलली असून त्यांनी राष्ट्रवादीतच राहण्याचा निर्णय घेतला आहे.
एप्रिल महिन्यात खडसे म्हणाले होते की भाजप हायकमांडसोबचं प्रवेशाचं ठरल्यानंतर आपण राष्ट्रवादीचा राजीनामा दिला होता. मात्र प्रवेश होईपर्यंत राष्ट्रवादीनं राजीनामा न स्वीकारण्याची भूमिका घेतली. त्यामुळे अधिकृतरित्या प्रवेश किंवा सोडचिट्टी असं काही घडलंच नसल्याचं खडसेंनी म्हटलं आहे.
गेल्या आठवड्यात गणेशोत्सवानंतर खडसेंच्या प्रवेशाचा निर्णय होईल, असे सांगून फडणवीसांनी या वादावर उत्तर दिले. पण विसर्जनाबरोबरच आपल्या भाजप प्रवेशाचा मुद्दाही विसर्जित झाल्याचं सांगत खडसेंनीच नकार दिला.